
हाय प्रोफाईल पार्ट्या आणि रात्रभर गजबज असलेल्या स्टेशन भागातील राजा बहाद्दूर मील परिसरात नामांकित हॉटेल, पब असून तरूणांईची मोठी गर्दी असते. विशेषतः विकेंडला याठिकाणी नाईटलाईफचे चित्र पाहण्यास मिळते. एकीकडे रात्री उशीरापर्यंत सुरू राहणार्या हॉटेल, अस्थापनांवर कठोर कारवाई होत असताना अशा ठिकाणी मात्र दुर्लक्ष्य होत असल्याचे दिसून येते.
मिल परिसरात उत्पादन शुल्कच्या एका अधिकार्याने पहाटे चारच्या सुमारास हॉटेलमधील वेटरला मारहाण केली. त्यानंतर हॉटेल बाहेरील तरुणीशी वाद घातला. घटनेचा सीसीटीव्ही व्हिडियो व्हायरल झाल्याने येथील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. शहर परिसरात रात्री ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ सुरू राहणार्या हॉटेल, पब, बारची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. विशेषतः विमानननगर, मुंढवा, येरवडा, कोरेगाव पार्क, राजा बहाद्दुर मिल यासारख्या भागात रात्री उशीरापर्यंत धांडगधिंगा सुरू राहत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपुर्वीच पुणे पोलिसांनी अशा अस्थापनांवर कारवाई करून येथील साउंड सिस्टीम जप्त केले होते. अनेक ठिकाणी नियमभंग करणार्या अस्थापनांवर गुन्हे दाखल केले होते. पोलिसांच्या या कारवाईमुळे काही दिवस शांतता दिसून आली. मात्र, कारवाई थंडावताच पुन्हा एकदा हे प्रकार सुरू झाले आहेत. नूकतेच कोरेगाव पार्क भागातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये राडा झाला. यानंतर आता मिल परिसरातील मारहाणीची घटना घडल्याने येथील सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. मिल परिसरातील हॉटेल, पबमध्ये शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. यादिवशी रात्री उशीरापर्यंत येथील पार्ट्या सुरू राहतात. यातून अनेकदा वादावादीचे प्रकार घडतात. त्यामुळे या नाईटलाईफ संस्कृतीला आळा कधी बसणार, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारण्यात येत आहे.
…पोलिसांची जूजबी कारवाई
काही दिवसांपुर्वी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शहर परिसरातील हॉटेल, पबमधील साऊंड सिस्टीमवर कारवाई केली होती. यावेळी शहरातील विविध भागात कारवाई करून तेथी साऊंड जप्त करण्यात आले. मात्र, मिल परिसरात कारवाई झालेली दिसून आले नाही. याठिकाणी काही प्रमाणात जूजबी कारवाई करून प्रकरण शांत केले जाते.























































