
>> नीलेश कुलकर्णी
हिमाचलमध्ये दणदणीत विजय मिळवून काँगेसने राहुल गांधी यांनी मेहनतीने आरंभलेली ‘भारत जोडो’ यात्रा काही प्रमाणात का होईना, सार्थकी लावली. तशी हिमाचलच्या जनतेची दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याची एक परंपरा आहे. देवभूमीतल्या या लोकांनी ती यावेळीही पाळली. हिमाचलमध्ये फारसे प्रयत्न न करताही काँग्रेसने भाजपला जोरदार तडाखा दिला. अर्थात भाजपमधील पक्षांतर्गत बेदिली आणि बंडखोरीनेही या ठिकाणी भाजपचा ‘खेला होबे’ झाला, हेदेखील खरे!
हिमाचल प्रदेश हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांचे हे गृहराज्य. त्यामुळे गुजरातइतके नसले तरी थोडेफार ग्लॅमर या निवडणुकीलाही होते. हिमाचल भाजपने जिंकले असते तर कदाचित नड्डा मुख्यमंत्री म्हणून राज्यात गेले असते. भाजप नेतृत्वात बदल झाला असता, मात्र या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल व त्यांचे चिरंजीव केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी स्वपक्षापासूनच ‘सुरक्षित अंतर’ राखले. इतरत्रही बंडखोरीने भाजपला धक्के दिले. भाजपची सत्ता आल्यानंतरही आपण मुख्यमंत्री होणार नाही, याची जाणीव झाल्याने अनुराग ठाकूर यांनी भाजपचाच ‘खेला होबे’ केला. ठाकूर यांच्या मतदारसंघात पाच जागा भाजप हरला. अनेक बुथवर भाजप पिछाडीवर गेला. राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघातही भाजपची वाताहत झाली. उरलीसुरली कसर भाजपातल्या इतर बंडखोरांनी भरून काढली. भाजपने दहा जागा केवळ 800 पेक्षा कमी मतांच्या फरकाने गमावल्या. हिमाचलसारख्या छोट्या व लोकसंख्येची घनता कमी असलेल्या राज्यात हे फॅक्टर महत्त्वाचे ठरत असतात. काँग्रेसकडे जिंकण्याची कोणतीही रणनीती नसताना जुनी पेन्शन योजना त्यांच्या मदतीला देवासारखी धावून आली. भाजपांतर्गत लाथाळ्याच इतक्या होत्या की, ही निवडणूक भाजप विरुद्ध भाजप अशीच लढली गेली. अर्थात या निवडणुकीने प्रेमकुमार धुमल यांच्या राजकीय कारकिर्दीला कायमचा पूर्णविराम दिला आहे, एवढे मात्र नक्की.
हिमाचलची निवडणूक सुरू असतानाचा किस्सा आहे. अनुराग ठाकूर प्रचार करत नसल्याच्या तक्रारी आल्यानंतर अमित शहा यांनी त्यांना दिल्लीत बोलावून घेतले. वडील आणि सासऱ्यांना विधानसभेचे तिकीट न दिल्याने अनुराग नाराज होते. वास्तविक, धुमल यांनी पंचाहत्तरी पार केल्यानंतर त्यांना तिकीट मागण्याचा अनुराग यांचा आग्रह अनाठायी होता. दिल्ली दरबारी आल्यावर अमित शाह यांनी हमीरपूरमधून 2024 मध्ये निवडणूक लढू इच्छिणाऱ्या प्रबळ इच्छुकांची नावे त्यांच्यापुढे ठेवली. ‘आगे चुनाव लढना है या घर परिवार की सेवा मे लगना है?’ अशा सूचक शब्दांत सुनावल्यानंतर अनुराग हिमाचलात गेले खरे, मात्र तनामनाने पक्षासाठी झटले नाहीत. त्याचे काय परिणाम होतात ते येत्या काळात समजेलच. मात्र गुजरात दणदणीतपणे जिंकत असताना हिमाचलने भाजपचे नाक कापले हे खरे. काँग्रेसकडे व्यापक यंत्रणा, नियोजन वगैरे नव्हते. मात्र प्रियंका गांधी, राजीव शुक्ला, मुकेश अग्निहोत्री या मंडळींनी भाजपमधील बेदिलीची फायदा उठवला. दोन्ही पक्षांतील मतांच्या टक्केवारीत फक्त एका टक्क्याचा फरक आहे. पंतप्रधानांनीही हा मुद्दा मांडला. तो खरा असला तरी शेवटी विजय तो विजयच. भाजपचे मावळते मुख्यमंत्री जयराम ठाकूर गेल्या पाच वर्षांत पूर्णपणे निष्प्रभ ठरले. अग्निवीर योजनेबाबत जनतेत नाराजी होती. या सगळ्यांचा फायदा काँग्रेसला झाला. या निवडणुकीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे राजस्थानात मुख्यमंत्रीपदाचा खेळ रंगात आलेला असताना अशोक गेहलोतांकडे जबाबदारी असलेल्या गुजरातमध्ये काँग्रेसचा पालापाचोळा उडाला; तर गेहलोतांचे विरोधक सचिन पायलटांनी हिमाचलमध्ये काँग्रेसच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्याची बक्षिसी पायलट यांना मिळते का हेही पाहणे मनोरंजक ठरेल. प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व संपून जाईल, अशा वल्गना करणाऱ्या नड्डा महाशयांना या निवडणुकीने लाखमोलाचा धडा दिला आहे. त्यातून त्यांनी काही शिकावे इतकेच!
मैनपुरी आणि ‘रामपूर के शोले’
मैनपुरीच्या लोकसभा पोटनिवडणुकीत दिवंगत मुलायमसिंगांबद्दलची कृतज्ञता मतपेटीत उमटली. नेताजींच्या सूनबाई डिंपल या दोन लाख 88 हजार मतांच्या विक्रमी मताधिक्क्याने विजयी झाल्या. हा विजय अपेक्षितच होता. मात्र, रघुराज शाक्य यांना निवडणूक रिंगणात उतरवून भाजपने आपल्याच हाताने स्वतःचे नाक कापून घेतले. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती. मात्र तसे झाले नाही. जनतेने भाजपला मैनपुरीत जागा दाखवून दिली असली तरी, उत्तर प्रदेशमध्ये बदलौकिक असलेल्या आझम खान यांचा रामपूर हा बालेकिल्ला उद्ध्वस्त करत भाजपने ऐतिहासिक कामगिरी केली. विशेषकरून या मतदारसंघात अर्ध्याहून अधिक मुस्लिम लोकसंख्या असतानाही भाजपच्या आकाश सक्सेना यांनी मिळविलेला विजय कौतुकास्पदच आहे. गेल्या चाळीस वर्षांत मस्तवालपणाचे राजकारण करणाऱ्या आझम खान यांचा अड्डा भाजपने उद्ध्वस्त केला. पनाडिया मुस्लिम आणि नबाब घराण्यातील मुस्लिम मते भाजपकडे वळली हेही महत्त्वाचे. चाळीस वर्षांत रामपूर म्हणजे आझम खान असे समीकरण होते. आझम खानच्या दहशतीखाली आझमपूर होते. त्याला पूर्णविराम मिळाला. खतौली या पश्चिम उत्तर प्रदेशातील जागेवर राष्ट्रीय जनता दलाच्या साह्याने मदन भय्या यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला. मात्र मैनपुरीतील विजयापेक्षा भाजपने रामपूरमध्ये मिळविलेला विजय हा विरोधकांसाठी भविष्यात धोक्याची घंटा आहे.
कुढनीचा धडा
बिहारच्या कुढनी विधानसभा पोटनिवडणुकीनेही विरोधकांची झोप उडवली आहे. लालू यादवांसाठी त्यांची कन्या रागिणी हिने किडनीदान केल्याने जगभरात एकीकडे लालू कन्या कौतुकाचा विषय ठरलेली असताना, लालूंच्या पक्षाला आपल्याच बालेकिल्ल्यात पराभवाची धूळ चाखावी लागली. नितीशबाबूंनी भाजपची साथ सोडून लालू यादवांचा कंदील हातात धरून सरकार स्थापन केल्यानंतरची ही नितीशबाबू- तेजस्वी यांची खरी परीक्षा होती. या परीक्षेत दोघेही सपशेल अपयशी ठरले. त्याचबरोबर लालू- नितीशकुमार यांना बिहारात पर्याय नाही, हे मिथकही या निकालाने तोडले. भाजपच्या विजयात चिराग पासवान यांचा मोलाचा वाटा असला तरी, कुढनीसारख्या बालेकिल्ल्यातील पराभव हा लालू परिवाराला अस्वस्थ करणारा आहे. कुढनीत भाजपच्या केदारप्रसाद गुप्ता यांनी सत्ताधारी पक्षाच्या मनोज कुशवाह यांचा दणदणीत पराभव केला. एकीकडे नितीशबाबूंना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यासाठी खटपटी सुरू असताना या निकालाने नितीशबाबूंच्या गोड घासात मिठाचा खडा लागला आहे, हे नक्की.


























































