विशेष लेख : उत्तर प्रदेश कसे वाचवणार?

19

>>निलेश कुलकर्णी<<

[email protected]

योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले त्यावेळी मोदीजी से भी योगीजी बेहतरअशा गर्जना केल्या गेल्या. मात्र आजची त्या राज्याची एकूण परिस्थिती अत्यंत निराशाजनक आहे. २०१४ मध्ये उत्तर प्रदेशमधील जनता जातपात विसरून मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली होती. मात्र हिंदुत्वाचा डंका पिटणाऱ्या योगी आदित्यनाथ यांच्या तऱहेवाईक कारभारामुळे हा प्रदेश पुन्हा मुलायममायावतींच्या राजवटीप्रमाणे जातीपातींमध्ये विखुरला गेला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत उत्तर प्रदेश कसे वाचवणार असा यक्षप्रश्न भाजपसमोर उभा राहिला आहे.

०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला जे प्रचंड यश  मिळाले त्यात उत्तर प्रदेशच्या ७१ खासदारांचा वाटा तेवढाच प्रचंड आणि मोलाचा होता. मात्र आज चारच वर्षांत तेथे भारतीय जनता पक्षाला पूर्ण बॅकफूटवर जावे लागले आहे. त्याला कारणीभूत ठरला आहे तो हिंदुत्वाचा डंका पिटणाऱ्या मात्र जातीयवादी राजकारणाला फूस देणाऱ्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गेल्या सवा वर्षांचा कारभार. घरांचे रंग आणि सोफ्याचे कलर भगवे करण्यापुरतेच योगींचे हिंदुत्व उरले आहे. अयोध्येतील राम मंदिराचे निर्माण मोदी आणि योगी ही जोडगोळी करेल असा प्रचार केला गेला. मात्र त्याच्या आसपासही घडामोडी घडताना दिसत नाहीत. योगींची प्रतिमा तर ढासळली आहेच, पण भाजपची ताकदही झपाटय़ाने कमी होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत या पक्षाला जेमतेम १५ ते २० जागा मिळतील असे भाकीत पक्षाच्याच अंतर्गत सर्वेक्षणाने केल्यामुळे त्या पक्षाची झोप उडाली आहे. त्यातच योगी विरुद्ध संघटन मंत्री सुनील बन्सल असा मुकाबलाही तेथे सुरू आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे काय होणार हा प्रश्न महत्त्वाचा ठरत आहे. हे राज्य वाचवण्यासाठी एकाची तरी ‘विकेट’ जाणे आवश्यक आहे. ती कोणाची पडते ते भविष्यात दिसेल.

केंद्रीय महिला मंत्री अनुप्रिया पटेल यांच्या गाडीचा पाठलाग करून काही टोळभैरवांनी त्यांची छेड काढण्याचा प्रयत्न केला तर दुसरीकडे भाजपचे आमदार नंदकिशोर गुजर यांच्यावर काही समाजकंटकांनी हल्ला केला. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात मंत्री आणि लोकप्रतिनिधी जर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांची काय अवस्था असेल याची कल्पनाच न केलेली बरी. त्यामुळे योगींच्या कौतुकाचे ढोल फुटले असतील अशी अपेक्षा करायला हवी. हिंदू एकजुटीने २०१४ मध्ये नरेंद्र मोदींचे हात मजबूत केले होते. इतकेच नाही तर उत्तर प्रदेशसारख्या सर्वाधिक मुस्लिम असलेल्या राज्यातून एकही खासदार लोकसभेत पोहोचू शकला नव्हता. हा ‘चमत्कार’ समस्त हिंदूंनी एकजुटीने करून दाखविला होता. मात्र १६ व्या लोकसभेची मुदत संपत असताना एकमेव मुस्लिम खासदार कैरानातून लोकसभेत पाठविण्याचा ‘अपशकुन’ योगींच्या राज्यात झाला आहे. योगी सत्तेवर आल्यानंतर ‘ऍण्टी रॅगिंग स्क्वॉड’च्या आरत्या ओवाळल्या गेल्या. मात्र अनुप्रिया पटेल प्रकरणामुळे सगळीच कल्हई खुलली आहे. काँग्रेसचा परंपरागत मतदार असलेला ब्राह्मण आणि दलित वर्ग काँग्रेस, मायावती व मुलायमसिंग यांच्या संधीसाधू राजकारणाला कंटाळून मोठय़ा प्रमाणावर भाजपकडे आकर्षित झाला होता. ‘राममंदिर निर्माण’ हे एक आकर्षण त्यामागे नक्कीच होते. मात्र हा संपूर्ण समाज विखरून टाकण्याचे महान कार्य योगींनी गेल्या सवा वर्षात करून दाखविले आहे. योगी पुरुषांना जात नसते असे म्हणतात. मात्र, जातीय अहंकारापोटी योगींनी गोरखपुरातून उपेंद्र शुक्लांचा पराभव केला. देशाच्या पंतप्रधानपदाचा मार्ग हा लखनौमधून जातो, असे नेहमीच म्हटले जाते. योगींनीच मोदींच्या २०१९च्या मार्गात खाचखळगे निर्माण करून ठेवले आहेत आणि ‘स्पीडब्रेकर्स’ही लावले आहेत. मोदी या रस्त्यावरून कसे मार्गक्रमण करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

पीयूष गोयलांची घिसाडघाई’

piyush-goyal-11

रेल्वेमंत्री पीयूष गोयल सध्या भलतेच हवेत आहेत. तसेही गोयल हे ‘कॉर्पोरेट राजकारणी’. सामान्य माणूस, कार्यकर्ते आणि पत्रकारांचा त्यामुळे त्यांना तिटकारा असणेही ओघानेच आले. कोळसा आणि ऊर्जा खात्यात त्यांनी चारदोन मोठे निर्णय घेतले. देशातील प्रत्येक गाव प्रकाशमान झाल्याचा प्रचार झाला. त्यामुळे पंतप्रधानांनी सुरेश प्रभूंची उचलबांगडी करून गोयलांकडे घसरलेल्या रेल्वेची जबाबदारी दिली. मात्र ‘पंत गेले राव चढले’ यापलीकडे फारसा फरक खात्यात पडला नाही. आपण फार कार्यक्षम नेते आहोत आणि आपल्या स्ट्रटेजीमुळेच सरकार चालते अशा आविर्भावात गोयल सध्या आहेत. अचानक आजारी पडलेल्या अरुण जेटलींच्या अर्थखात्याची अतिरिक्त जबाबदारी गोयलांकडे देण्यात आली. मात्र गोयल यांनी घिसाडघाईने पूर्णवेळ अर्थमंत्री असल्याचा आविर्भाव आणत मग बैठकांचा दणका उडवून दिला. इतकेच नाही अर्थखात्याच्या वेबसाईटवर आपली छबी झळकवण्याचा आततायीपणा केला. अरुण जेटलींनी वरिष्ठांकडून गोयल यांचे कान पिरगळले. किडनीचे ऑपरेशन असले तरी जेटलींचे आपल्या खात्याकडे पूर्ण लक्ष आहे आणि ते अधिकाऱ्यांच्या संपर्कात असतात. त्यामुळे आता गोयलांचे ‘तारे अखेर जमीन पर’ आले आहेत.

मनमोहन सिंग यांचा अपमान

manmohan-sing

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग कसे ‘ग्रेट’ होते हे सांगण्याची सध्या काँग्रेसमध्ये स्पर्धा सुरू आहे. मात्र ती किती भंपक आहे याचा प्रत्यय नुकताच रमजान ईदच्या निमित्ताने आला. तसे पाहिले तर मनमोहन सिंग यांचा ते पंतप्रधान असतानाही पाणउतारा करण्याची संधी काँग्रेस नेतृत्वाने कधी सोडली नव्हती. मात्र हल्ली मोदी सरकारच्या कामगिरीमुळे जनमत ‘‘इनसे तो मनमोहन सिंगजी ठीक थे’’ असे बनत आहे. साहजिकच सध्या काँग्रेसला डॉक्टरसाहेबांबद्दल प्रेमाचे भरते आले आहे. मात्र याच मनमोहन सिंग यांचा अपमान ईदच्या मुहूर्तावर काँग्रेसने केला. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी नागपुरात संघाच्या कार्यक्रमात ‘बौद्धिक’ देऊन आल्याने प्रणवदांना या ईद मीलनाला बोलावले जाणार का याबाबत शंकाकुशंका वर्तविल्या जात होत्या. मात्र या ईद मीलन कार्यक्रमात काँगेस अध्यक्ष राहुल गांधींनी आपल्या टेबलवर प्रणवदा, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि कॉम्रेड सीताराम येचुरी यांच्यासह बिर्याणीवर ताव मारला. डॉ. मनमोहन सिंग यांना राष्ट्रवादीचे डी.पी. त्रिपाठी आणि राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा अशा तुलनेत कमी महत्त्वाच्या नेत्यांसोबत अंगतपंगत करावी लागली. मनमोहन सिंग कसे थोर अर्थतज्ञ वगैरे सांगून काँग्रेस हल्ली त्यांच्या नावाने ढोल वाजवत असते. माजी पंतप्रधान म्हणून सोडा, पण देशातील एक ज्ञानी माणूस म्हणून तरी राहुल गांधी मनमोहन सिंग यांना जेवणाच्या टेबलावर स्थान देऊ शकले असते. अर्थात मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांचा अध्यादेश पत्रकार परिषदेत टराटरा फाडणाऱ्या राहुल गांधींकडून ही अपेक्षा बाळगणेही दुधखुळेपणाचेच. देशाचे दहा वर्षे पंतप्रधानपद भूषविणाऱ्या मनमोहन सिंग यांनी या अपमानाची वाच्यता केली नाही हा त्यांचा मोठेपणा.

आपली प्रतिक्रिया द्या