
सामना प्रतिनिधी । नगर
राज्यामध्ये साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. पण गेल्या काही दिवसांपासून म्हणावी अशी मागणी न आल्यामुळे नगर व नाशिक विभागातील कारखान्यांनी तयार केलेली तब्ब्ल 9 लाख टन साखर शिल्लक राहिली आहे. दरम्यान, उत्पादन करुन जर उपयोग होणार नसेल तर भविष्यात कवडीमोल भावाने ती साखरी विकायची का ? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. त्यामुळे सारखेरचा प्रश्न जिल्हयामध्ये चांगलाच ऐरणीवर आला आहे.
गेल्या गाळप हंगामात नगर प्रादेशिक साखर उपसंचालक कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या नगर व नाशिक जिल्ह्यातील कारखान्यांनी विक्रमी साखर उत्पादन केले होते. दोन्ही जिल्ह्यांतून तब्बल सोळा लाख 33 हजार टन साखर उत्पादन झाले होते. नगर जिल्ह्यातील खासगी व सहकारी कारखान्यांनी 15 लाख टन साखर उत्पादन केले होते. गेल्या हंगामातील साखरविक्री होऊन ऑक्टोबर महिन्यात 4 लाख 30 हजार टन साखर शिल्लक राहिली होती. गेल्या वर्षी तयार झालेल्या साखरेपैकी 25 टक्के साखर साठा शिल्लक राहिला. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात गाळप हंगाम सुरू झाला होता. साखर उत्पादन वेगाने होत आहे. त्यामुळे 15 जानेवारीअखेरपर्यंत कच्ची व पांढरी अशी 8 लाख 25 हजार टन साखर उत्पादित झाली आहे. शिल्लक व यंदाच्या हंगामामधील अशी बारा लाख टन साखर विक्रीसाठी उपलब्ध होती. परंतु, त्यापैकी केवळ 30 टक्केच म्हणजे 3 लाख 27 हजार टन साखरविक्री झाली आहे. साखरेला मागणी नसल्याने तब्बल 9 लाख टन साखर गोदामांमध्ये पडून आहे. त्यात काही कारखान्यांकडे 60 ते 80 टक्के साखर साठा पडून आहे. राज्य सहकारी बँकेकडे कारखाने साखर तारण ठेवून कर्ज घेत आहे. त्यातून ऊस उत्पादकांचे देणे, कामगारांचे पगार देण्यात येत आहेत. परंतु, साखरेला योग्य दर मिळत नसल्याने हे देणे देण्यासाठी कारखान्यांना पुरेसे पैसे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे कारखान्यांकडे कोट्यवधी रुपयांची एफआरपी थकलेली आहे. या सर्व परिस्थितीमुळे कारखान्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.
साखर कारखान्यांकडील साठा (15 जानेवारीपर्यंत)
कारखाना साखरसाठा (टनामध्ये)
अंबालिका 1 लाख 17 हजार
ज्ञानेश्वर 80 हजार 977
मुळा 76 हजार 130
कुकडी 59 हजार 890
प्रवरा 72 हजार 192
संगमनेर 69 हजार 294
श्रीगोंदा 50 हजार 926
अगस्ती 30 हजार 429
अशोक 26 हजार 54
सरासरी तीन हजार रुपयापर्यंत भाव
गेल्या महिन्यात कारखान्यांनी 62 हजार 542 टन साखरविक्री केली आहे. या कारखान्यांना साखर विक्रीतून सरासरी क्विंटलला 2 हजार 900 ते तीन हजार रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. अगस्ती कारखान्याने 2 हजार 927 रुपये, गणेशने 3 हजार 9 रुपये, अंबालिका कारखान्याने 2 हजार 954 रुपये, मुळा कारखान्याने 3 हजार 4 रुपये क्विंटलने साखरविक्री केली आहे.































































