
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
हिंदुस्थानात होळीला लोकांनी माझ्या पुतळय़ांचे दहन केले, असे सांगतानाच आपण मायदेशी परतलो तर आपले ‘मॉब लिंचिंग’ केले जाईल, असा कांगावा पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळय़ाचा मुख्य आरोपी नीरव मोदी याने केला आहे.
माझ्या जिवाला धोका असताना मी हिंदुस्थानात परतू कसा, असा सवाल त्याने अंमलबजावणी संचालनालयाला ‘ई-मेल’ पाठवून विचारला आहे. सीबीआयने केलेल्या छळामुळे डी. जी. बन्सल यांच्यासारख्या अधिकाऱयाने केलेल्या आत्महत्येच्या प्रकरणाचा दाखला देत नीरव मोदी याने हिंदुस्थान आपल्यासाठी सुरक्षित नसल्याचे म्हटले आहे.
नीरव मोदी हा ‘पीएनबी’ बँकेतील 13 हजार 500 कोटी रुपयांच्या घोटाळय़ातील मुख्य आरोपी आहे. मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने 24 आणि 26 मे रोजी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यानंतर त्या दोघांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले. तसेच इंटरपोलने त्यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही बजावली आहे. या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने हिंदुस्थानातील आणि परदेशातील मिळून 4 हजार 800 कोटींची त्यांची मालमत्ता जप्त केली आहे.
नीरव मोदी याला फरार घोषित करावे, अशी मागणी ‘ईडी’ने केली होती; पण तो वैध पासपोर्ट आणि व्हिसा घेऊन देशाबाहेर गेला आहे. तसेच तो जातेवेळी त्याची खाती ‘एनपीए’ नव्हती हे आम्ही निदर्शनास आणून दिले आहे.
व्ही. अग्रवाल, नीरव मोदीचे वकील

























































