बँक कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळेच नीरव मोदी सापडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
nirav-modi-new

सामना ऑनलाईन । लंडन

पीएनबी बँकेला 14 हजार कोटी रुपयांचा चुना लावून हिंदुस्थानातून पळालेला नीरव मोदी अखेर बँक कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळेच पोलिसांच्या तावडीत सापडला. लंडनमधील वेस्टमिंस्टर कोर्टाने अटक वॉरंट जारी केलेला नीरव मोदी बुधवारी लंडनमधील एका बँकेत खाते उघडण्यासाठी गेला होता. यावेळी बँकेतील एका कर्मचाऱ्याने त्याला ओळखले व त्याबद्दलची माहिती त्याने पोलिसांना दिली.

काही दिवसांपूर्वीच नीरव लंडनमध्ये खुलेआम फिरत असल्याचा एक व्हिडीओ ‘टेलिग्राफ’ या इंग्रजी दैनिकाने प्रसारित केला होता. नीरव मोदीच्या विरोधात बजावलेल्या ‘रेड कॉर्नर’ नोटिसवर कारवाई करून त्याला त्वरित अटक करण्याची मागणी सीबीआयने इंटरपोल आणि ब्रिटनच्या सरकारकडे केली होती. बुधवारी तो लंडनमधील मेट्रो बँकेत खाते उघडण्यासाठी गेला असता तेथील एका सतर्क कर्मचाऱ्याने नीरव मोदीची माहिती पोलिसांना दिली. नीरव मोदी बद्दल माहिती मिळताच स्कॉटलँड यार्ड पोलिसांचे पथक बँकेत पोहोचले व त्यांनी नीरव मोदीला बेड्या ठोकल्या. अटक केल्यानंतर त्याला वेस्टमिंस्टर न्यायालयात हजर केले असता न्यालयाने त्याला 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, हिंदुस्थानकडून मोदी याचे प्रत्यार्पण करण्यात यावे अशी मागणी ब्रिटनकडे करण्यात आली आहे.