
पंजाब नॅशनल बँकेतील 14 हजारो कोटींच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यात आले आहे. विशेष पीएमएलए कोर्टाने गुरुवारी हा निर्णय दिला. मद्यसम्राट विजय मल्ल्यानंतर फरार आर्थिक गुन्हेगार ठरलेला मोदी हा दुसरा आरोपी आहे.
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्य़ाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नीरव मोदीविरोधात विशेष पीएमएलए न्यायालयात खटला दाखल केला आहे. वारंवार समन्स बजावूनही मोदी न्यायालयीन कार्यवाहीसाठी सामोरा जात नसल्याने त्याला ऑगस्ट 2018 सालापासून लागू झालेल्या नव्या कायद्यान्वये फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करावे अशी मागणी ईडीने न्यायालयाला केली होती. या अर्जावर आज सुनावणी होऊन विशेष पीएमएलए कोर्टाचे न्यायाधीश व्ही. सी. बर्डे यांनी मोदीला फरार घोषित केले. नीरव मोदी आणि त्याचा काका मेहुल चोक्सी हे पीएनबी घोटाळ्यातील प्रमख आरोपी आहेत. पीएनबी घोटाळा जानेवारी 2018 साली उघड झाल्यानंतर दोघांनी देश सोडून पलायन केले. त्यानंतर मार्च 2019 साली मोदीला लंडन पोलिसांनी अटक केली. त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रियाही प्रलंबित आहे.





















































