
2012 मध्ये झालेल्या दिल्ली सामूहिक बलात्कारातील आरोपींना शुक्रवारी पहाटे फासावर लटकवण्यात आले. सात वर्षानंतर निर्भयाला अखेर न्याय मिळाला आहे. या घटनेतील आरोपी पवन, अक्षय, विनय आणि मुकेश हे तुरुंगात कैद होते. यादरम्यान मुकेश सोडून सर्वांनी तुरुंगात कामेही केले आणि त्यांची मजूरीही त्यांना मिळाली.
गेल्या सात वर्षात केलेल्या कामातून चारही आरोपींनी 1 लाख 37 हजार रुपये कमावले होते. हे पैसे त्यांच्या कुटुंबीयांना मिळणार आहेत. तुरुंगात असताना अक्षयने 69 हजार रुपये, पवने 29 हजार तर विनयने 39 हजार रुपये कमावले होते.
16 डिसेंबर 2012 मध्ये एका तरुणीवर अमानुष सामुहिक बलात्कार झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण देशात एक संतापाची लाट उसळली होती. त्यावेळी 6 आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यापैकी एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बालसुधारगृहात केली होती. तर एका कैदीने तुरुंगातच आत्महत्या केली होती. इतर उर्वरित 4 आरोपींना शुक्रवारी 5.30 वाजता फाशीची शिक्षा देण्यात आली. फाशीपूर्वी सर्व दोषी घाबरले होते. फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी झाल्यानंतर लोकांनी उत्साह साजारा केला. आपल्या मुलीला न्याय मिळाला अशी भावना निर्भयाच्या आईने व्यक्त केली.






















































