नेता हा अभिनेताच असतो!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
आपल्या धडाकेबाज कामाच्या शैलीने परिचित असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रस्ते व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरीदेखील पंतप्रधानांसोबत पुन्हा मंत्रिपदाची शपथ घेणार

सामना प्रतिनिधी, नागपूर

नेता हा आभिनेताच असतो. त्याला सर्व भूमिका पार पाडाव्या लागतात. कधी खोटे बोलावे लागते तर कधी गोड बोलावे लागते. पण मला खोटे बोलणे आवडत नाही असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.

चिटणवीस सेंटरतर्फे आयोजित प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. निवेदक मनोज साल्पेकर यांनी ही मुलाखत घेतली. यावेळी गडकरींचे पोट्रेट व कार्टून काढण्यात आले. तसेच त्यांच्यावर कविता सादर करण्यात आली. ”मला खोटे बोलता येत नाही. ओठात एक आणि पोटात एक असा माझा स्वभाव नाही. जे मनात असेल ते थेट बोलतो. एकच गोष्ट वारंवार केल्याने त्या गोष्टीचा उबग येतो. म्हणून अनेकदा इतर क्षेत्रांत रस घेतो. कृषीमध्ये मला विशेष रस आहे”, असे गडकरी म्हणाले.

”एखादी गोष्ट होत नाही असे कोणी सांगत असेल तर ती गोष्ट पूर्ण करून दाखवण्याची जिद्द माझ्याकडे आहे. काहीही करून मी ती गोष्ट पूर्ण करतोच. राजकारणात चतुर असावे पण चतरे नसावे. आपले काम पॅशनने करावे असा माझा आग्रह असतो. नापास होणारे लोक मिनिस्टर होतात तर आयएएस, आयपीएस होणारे लोक अधिकारी होतात”, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. ‘मी मराठी भावागीतांचा दर्दी आहे. दिल्लीत सकाळी व्यायाम झाला की आशा भोसले, अरुण दाते यांची गाणी मी नियमित ऐकतो’, असे त्यांनी सांगितले. ‘मला नवनवीन प्रयोग करायला आवडतात. माझ्या आयक्यूची किंमत लावली तर ती दोनशे कोटींच्या वर जाईल’, असे ते म्हणाले.