नाराज मेधा कुलकर्णींच्या घरी नितीन गडकरी, पुण्यातील भाजप नेत्यांना संदेश

चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या श्रेयवादावरून भाजपमध्येच वाद उफाळल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यपद्धतीबद्दल जाहीर नाराजी व्यक्त करणाऱया कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या घरी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट दिली. त्यानंतर कुलकर्णी यांच्या चेहऱयावर हास्य फुलले.

कार्यक्रमपत्रिकेमध्ये नाव न टाकल्याने मेधा कुलकर्णी यांनी ‘हा तर माझे अस्तित्व संपवण्याचा कट’ असल्याचे म्हणत सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती. त्यांचा रोख पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर होता. त्यांच्या या भूमिकेमुळे भाजपमध्ये खळबळ उडाली होती. मात्र, आज त्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. इतर कोणत्याही नेत्याने भाषणात त्यांचा उल्लेख केला नाही. मात्र, नितीन गडकरी यांनी कार्यक्रमात मेधा कुलकर्णी आणि दिवंगत खासदार गिरीश बापट यांनी उड्डाणपुलासाठी पाठपुरावा केल्याचा आवर्जून उल्लेख केला.

गडकरी यांनी कार्यक्रम संपल्यानंतर दुपारी मेधा कुलकर्णी यांच्या कोथरूड येथील निवासस्थानी भेट दिली व त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. पाणीपुरी, भेळ, ड्रायफ्रूट्स, लाडू याचा आस्वाद त्यांनी घेतला. या भेटीपासून स्थानिक भाजपचे नेते दूर होते. मात्र, गडकरी यांनी कुलकर्णी यांच्या घरी भेट देऊन काय तो संदेश पुण्यातील स्थानिक भाजप नेत्यांना दिला आहे.