
निवारा टेस्ट्रामेंटरी ट्रस्टच्या हजारो कोटींच्या ठेवींमधून अवघ्या 5 ते 6 हजार रुपयांत तब्बल 25 लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱया पूजा अजित भोसले-जोशी (रा. सिल्व्हर आर्च अपार्टमेंट, राजारामपुरी, कोल्हापूर) आणि भरत श्रीपाल गाठ (रा. यड्राव रोड, इचलकरंजी) या दोघांचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी फेटाळला. न्यायालयात जमा करावयाची 22 लाखांची रक्कम भरली नसल्याने जामीन फेटाळल्याची माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक सुनीता शेळके यांनी दिली.
निवारा ट्रस्टच्या या फसवणुकीविरोधात यापूर्वी सचिन देसाई यांनी 432 जणांची 22 लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात केली आहे. तर आज आणखी नऊजणांनी एकूण 151 जणांची निवारा ट्रस्टकडून तब्बल 44 कोटी 78 लाख 73 हजार 550 रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत पूजा भोसले-जोशी, भरत गाठ यांच्यासह राहुल रमेश भोसले (रा. पूजाप्रिया पार्क, घाटगे-पाटील इंडस्ट्रीजसमोर, उचगांव, कोल्हापूर), संतोष विश्वास तोडकर (रा. हॉकी स्टेडियम चौक, कोल्हापूर) आणि अजित आर. खाडे (रा. कोल्हापूर) यांची नावे असून, आणखी तक्रारी व संशयित वाढण्याची शक्यता आहे.
नोव्हेंबर 2021 मध्ये संशयित आरोपींनी अर्जदारांच्या राजारामपुरी येथील ऑफिसमध्ये भेट घेऊन त्यांच्या निवारा ट्रस्टकडे फंड असून, गरजू लोकांना देऊ इच्छितात. त्यासाठी कागदपत्रे तयार करण्यास प्रत्येकी 6 हजार 500 रुपये द्यावे लागतील. 6 ते 7 महिन्यांनंतर प्रत्येकाला 25 लाख रुपये मिळतील, असे सांगितले. तसेच जवळचे वा ओळखीचे लोकही याचा फायदा घेऊ शकतात, असे सांगितले. हा सर्व व्यवहार आय.डी.बी.आय. बँकेतून होणार असल्याचे सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून एकूण 151 लोकांचे प्रत्येकी 6500 अशी एकूण 9 लाख 81 हजार 500 रुपयांची रोख स्वरूपात व काहींनी संतोष तोडकर व अजित खाडे यांच्या बँक खात्यात एनईएफटी केली.
दरम्यान, मुदतीनंतर 7 ते 8 महिन्यांनी वारंवार चौकशी केली असता, पैसे परत मिळण्याची मुदत पुढे गेल्याचे सांगण्यात आले. फेब्रुवारी 2023 मध्ये 151 लोकांच्या नावाच्या आयडीबीआय बँक, लोकमान्यनगर, पुणे शाखेच्या प्रत्येकी 29 लाख 66 हजार 50 रुपयांच्या ठेव पावत्या दिल्या. तसेच याची रक्कम 18 एप्रिल 2023 ला मिळेल, अशी खात्री दिली. त्यानंतरही संतोष तोडकर याने अजून 6 महिने लागतील, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यात गेल्या 4-5 दिवसांत प्रसारमाध्यमांतून निवारा ट्रस्टकडून लोकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे चव्हाटय़ावर आले. त्यामुळे तक्रारींचा ओघ आणि फसवणुकीचा आकडा वाढताना दिसत आहे.
प्रजासत्ताक सामाजिक संस्था व कॉमन मॅन संघटनेची मदत
तक्रारदारांनी प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्था आणि कॉमन मॅन संघटनेकडे धाव घेतली. दोन्ही संस्थांनी तक्रारदारांना न्यायालयीन कामकाजात मदत केली. ऍड. बाबा इंदुलकर यांनी आज न्यायालयात या 151 जणांच्या वतीने बाजू मांडली. ऍड. ए. ए. महाडेश्वर यांनीही बाजू मांडली. त्यानंतर न्यायालयाने संशयितांचा जामीन अर्ज फेटाळल्याचे प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे दिलीप देसाई यांनी सांगितले.


























































