खेड तालुक्यातील कुठल्याही धरणाला धोका नाही, पाटबंधारे विभागाच्या तपासणी पथकाचा निर्वाळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, खेड

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण दूर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या आदेशानुसार खेड तालुक्यातील सर्व धरणांची पाहणी करण्यात आली असता तालुक्यातील कुठल्याही धरणाला धोका नसल्याने स्पष्ट झाले असल्याची माहिती पाटबंधारे विभागचे अधिकारी गोविंद श्रीमंगले यानी माध्यमांना दिली .दरम्यान पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जगदिश पाटील मंगळवारी खेडला भेट देऊन तालुक्यातील धरण प्रकत्यांच्या आजच्या स्थितीचा आढावा घेणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फूटून भेंदवाडीतील 24 जणांचा बळी गेला. अचानक झालेल्या जलप्रलयात भेदवाडीचे अस्तित्वच पुसले गेले. या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील धरण परिसरातील नागरिकांच्या डोक्यावर भितीचे ढग गडद होऊ लागले. 1996 साली बांधण्यात आलेल्या कोंडिवली धरण परिसरातील ग्रामस्थांनी तर धरणाला गळती लागली असल्याची तक्रार करत प्रशासनाकडे धाव घेतली. ग्रामस्थांच्या या तक्रारीची गांभिर्याने दखल घेत जिल्हाधिकारी सूनिल चव्हाण यानी खेड तालूक्यातील सर्व धरण प्रकल्पांची पाहणी करून त्याबाबसचा अहवाल सादर करण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला दिले.

या नुसार खेड तालुक्यातील कोंडिवली शिरवली नातूवाडी शेलारवाडी पिंपळवाडी या धरणांची पाहणी पथकातर्फ तपासणी करण्यात आली. धरणाची सध्याची स्थिती काय आहे या तपासणीसाठी शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार केलेल्या तपासणीत खेड तालूक्यातील एकही धरण धोकादायक नसल्याचे स्पष्ट झाले. खेड तालूक्यातील ज्या ज्या धरणात पाणी साठा आहे त्यापैकी कोणत्याही धरणाला सद्यस्थितीत धोका नसल्याने धरण परिसरातील नागरिंकानी भितीच्या दडपणाखाली राहू नये, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

खेड तालुक्यातील सारी धरणे धोक्याच्या बाहेर असली तरी साली बांधलेल्या तळवट धरणाच्या सुरक्षिततेबाबत थोडी शंका आहे. तळवट धरणाला सद्यस्थितीत लागलेली गळती धरण परिसरातील ग्रामस्थांच्या डोक्यावरची टांगती तलवार असल्याची तक्रार ग्रामस्थानी केली आहे. ग्रामस्थांची ही तक्रार गंभीर असल्याने पाटबंधारे विभागाचे विशेष पाहणी पथक तळवट डॅमला भेट देवून धरणाची पाहणी करणार असल्याचे समजते.