ना निलंबन मान्य, ना अस्थायी समिती! संजय सिंह यांचा आडमुठा पवित्रा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय कुस्ती महासंघाच्या (डब्लूएफआय) निवडणुकीनंतर सुरू झालेल्या नाटय़मय घडामोडी थांबण्याचे नाव घेईना. पेंद्रीय क्रीडा मंत्रालयाने तडकाफडकी निलंबित केलेले ‘डब्लूएफआय’चे अध्यक्ष संजय सिंह यांनी ‘मला ना निलंबन मान्य आहे, ना अस्थायी समिती’ असा आडमुठा पवित्रा घेतला आहे. आपण कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा घेणारच आहोत, असेही त्यांनी सांगितले.

पेंद्रीय क्रीडा मंत्रालयाने डब्लूएफआयच्या घटनात्मक नियमांची पायमल्ली केल्याचा ठपका ठेवत संजय सिंह व त्यांची नवनिर्वाचित कार्यकारिणी निवडणुकीनंतर तीनच दिवसांत बरखास्त केली. त्यानंतर हिंदुस्थान ऑलिम्पिक समितीने (आयओए) कुस्ती महासंघाचा कारभार पाहण्यासाठी भूपेंदर सिंह बाजवा यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय अस्थायी समिती नेमली. या अस्थायी समितीने 2 ते 5 फेब्रुवारी दरम्यान जयपूर (राजस्थान) येथे वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

मात्र, आपण लोकशाही मार्गाने निवडून आलेलो आहोत, असे संजय सिंह यांचे म्हणणे आहे. ते म्हणाले, ‘आमच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या नावाखाली निवडणूक अधिकाऱयांची स्वाक्षरी आहे याकडे क्रीडा मंत्रालयाला दुर्लक्ष करता येणार नाही. आम्हाला कुस्ती महासंघावर हिंदुस्थान ऑलिम्पिक असोसिएशनकडून नेमण्यात आलेली तीन सदस्यीय अस्थायी समिती अजिबात मान्य नाही. आमचे निलंबनदेखील आम्हाला मान्य नाही. त्यामुळे दोन-तीन दिवसांत नोटीस काढून आम्ही लवकरच कार्यकारी समितीची बैठक बोलावून पुढील निर्णय घेऊ’, असा इशाराही संजय सिंह यांनी दिला आहे.