शहापूरच्या सरकारी आश्रम शाळांमध्ये पाणीबाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

 सामना ऑनलाईन | शहापूर

पोषण आहार आणि गैरसोयींमुळे नेहमी वादात असलेल्या शहापूरच्या सरकारी आश्रमशाळांमधील विद्यार्थी ऐन परीक्षा काळात तहानेने व्याकूळ झाले आहेत. पाणीपुरवठा करणारी बोअरवेल आटल्याने सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागत असून तहान भागवण्यासाठी त्यांना टँकरचे दूषित पाणी प्यावे लागत आहे. एकीकडे पिण्यासाठी पाणी नाही तर दुसरीकडे आंघोळीचीही बोंब आहे. पाणीबाणीमुळे या विद्यार्थ्यांना शारीरिक स्वच्छतेसाठी पुरेसे पाणी मिळत नसून अस्वच्छ शौचालयांमधून येणार्या दुर्गंधीमुळे त्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.

शहापूरच्या आदिवासी विकास प्रकल्प विभागांतर्गत शहापूर, मुरबाड व भिवंडी तालुक्यातील एकूण 23 आश्रमशाळा आहेत. या आश्रमशाळांपैकी बहुतांशी ठिकाणी बोअरवेल आटल्याने व जवळपास पाण्याचा स्रोत नसल्याने सुसरवाडी, सावरोली, मोरोशी, टाकीपठार, माळ (विहिगाव), डोळखांब व चिंबीपाडा या आश्रमशाळांना भीषण पाणीटंचाई सहन करावी लागत आहे. या शाळांमध्ये दोन हजारांहून अधिक विद्यार्थी असून सध्या या आश्रममध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. एकीकडे व्याकूळ करणारा उकाडा तर दुसरीकडे परीक्षेचे टेन्शन अशा अवस्थेत तहान भागवण्यासाठी टँकरचे दूषित पाणी पिण्याची वेळ त्यांच्यावर ओढावली आहे. पाण्याची बोंबाबोंब असल्याने आंघोळीसाठी तसेच शौचालयासाठी पुरेसे पाणीही त्यांना मिळत नाही. अनेक वेळा तर आंघोळीविनाच त्यांना अभ्यासाचे धडे गिरवावे लागत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.

दिवसाआड टँकर

आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांनी पाण्याचा तुटवडा होऊ नये यासाठी प्रकल्प कार्यालयाकडून टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी मंजूर करून घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार काही आश्रमशाळांना दररोज दोन टँकर तर काही ठिकाणी रोज एक तर काही ठिकाणी एक दिवसाआड टँकर सुरू आहेत.

टँकरच्या अस्वच्छ पाण्यावरच विद्यार्थ्यांना तहान भागवावी लागत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. स्वच्छतेसाठीही पुरेसे पाणी मिळत अनेक ठिकाणी शौचालयांची दुरवस्था झाली आहे. अस्वच्छ शौचालयाची दुर्गंधी आश्रमशाळा परिसरात पसरली असून नाक मुठीत धरूनच विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जावे लागत आहे.