#CAB ईशान्य हिंदुस्थानात उद्रेक; आसाम, त्रिपुरा पेटले!

538

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक संसदेत केंद्र सरकारने मंजूर करून घेतले असले तरी ईशान्य हिंदुस्थानात उद्रेक उसळला आहे. आसाममध्ये प्रचंड हिंसाचार भडकला असून जाळपोळ सुरू आहे. गुवाहाटीत संचारबंदी लागू केली आहे. सर्वत्र कडकडीत बंद असून रेल्वे, बस सेवेसह सर्व जनजीवन ठप्प झाले आहे. नागरिकांनी नग्न मोर्चा काढून केंद्र सरकारचा निषेध केला. मुख्यमंत्री सोनोवाल यांना विमानतळावरच अडकून रहावे लागले. पोलिसांनी अनेक ठिकाणी लाठीमार करीत अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या. रबरी बुलेटचा गोळीबार केला. त्रिपुरा, मणिपूर, मिझोराममध्येही प्रचंड तणाव आहे. दरम्यान, जम्मू-कश्मीरातील 5 हजार जवान ईशान्येकडील राज्यांमध्ये तैनात करण्यात आले आहेत.

नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध करण्यासाठी सोमवारी मध्यरात्रीपासून आसाम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, मणिपूर या ईशान्य हिंदुस्थानातील राज्यांमध्ये आंदोलन सुरू होते. मंगळवारी विविध विद्यार्थी संघटनांनी पुकारलेल्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. बुधवारी अक्षरशः उद्रेक झाला आहे.

आसाममध्ये प्रचंड जाळपोळ, हिंसाचार
– आसाममध्ये प्रचंड हिंसाचार भडकला असून सर्वत्र जाळपोळ, दगडफेक सुरू आहे. गुवाहाटीतील इंजिनीअरिंग, मेडिकलसह विविध महाविद्यालयांमधील हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. विद्यार्थ्यांनी सरकारी जाहिरातींचे पोस्टर्स फाडले. विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलल्या.
– अनेक ठिकाणी दगडफेक करीत वाहनांना आगी लावल्या.
– गुवाहाटीसह अनेक ठिकाणी पोलिसांनी लाठीहल्ला करीत अश्रुधुरांच्या नळकांडय़ा फोडल्या. रबरी बुलेटचा गोळीबार केला. एक हजारावर आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
– शिवसागर जिल्ह्यातील लाखवा येथे तेलांच्या विहिरी असलेल्या परिसरात नागरिकांनी घुसण्याचा प्रयत्न केला.
– सर्वत्र कडकडीत बंद असून गुवाहाटीसह आसामच्या 24 जिह्यांत मोबाईल, इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
– सायंकाळी 6.15पासून गुवाहाटीत संचारबंदी लागू केल्याचे पोलीस आयुक्त दीपक कुमार यांनी सांगितले.
– रेल रोको आंदोलनही सुरू असल्याने रेल्वे सेवा सोमवारपासून ठप्प आहे. अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत.
– गुवाहाटीसह देब्रूगड, लखीमपूर, जोरहाट, गोलाहाट, शिवासागरसह सर्व जिह्यांत बंद, तणाव आहे.

मुख्यमंत्री सोनोवाल विमानतळावर अडकले
– नागरिकत्व विधेयकाला पाठिंबा देणारे भाजपचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याविरुद्ध जनतेत तीव्र संताप आहे. सोनोवाल हे दिल्लीवरून गुवाहाटी विमानतळावर आले. मात्र नागरिकांनी विमानतळाबाहेर प्रचंड आंदोलन केले. रस्त्यांवर टायर जाळले. यामुळे सोनोवाल काही तास विमानतळावर अडकून राहिले. मोठा पोलीस फौजफाटा असतानाही ते विमानतळाबाहेर पडू शकले नाहीत.

सचिवालयाबाहेर धुमश्चक्री
गुवाहाटीतील राज्य सरकारच्या सचिवालयावर शेकडो विद्यार्थ्यांनी धडक देण्याचा प्रयत्न केला. या वेळी विद्यार्थी आणि सुरक्षा जवानांत जोरदार धुमश्चक्री झाली. अनेक विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांचा नग्न मोर्चा
शिवसागर शहरात ऑल आसाम माटक स्टुडंट युनियन वर्कर्स संघटनेच्या तरुणांनी चक्क नग्न मोर्चा काढून केंद्र सरकारचा निषेध केला. पोलिसांनी मोर्चा अडवला आणि तरुणांना ताब्यात घेतले. दरम्यान, मुख्यमंत्री सोनोवाल यांच्या निवासस्थानाबाहेर निषेधाचे पोस्टर्स लावण्यात आले होते.

पंतप्रधान मोदी-शिंजो आबे यांच्या समीटसाठीचा रॅम्प जाळला
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यात 15 डिसेंबरला गुवाहाटी येथे इंडो-जपान समीट होणार आहे. ताज व्हिवांता येथे या समीटसाठी रॅम्प तयार करण्यात आला होता. मात्र आंदोलनकर्त्यांनी हा रॅम्पच मंगळवारी जाळून टाकला आहे. दरम्यान, आसाममध्ये आगडोंब उसळल्यामुळे गुवाहाटीत ही समीट होण्याची शक्यता कमी आहे.

कश्मीरातील 5 हजार जवानांना ईशान्येकडे हलवले
जम्मू-कश्मीरात तैनात असलेले सीआरपीएफ, बीएसएफ आणि एसएसएफ जवांनाच्या 50 कंपन्या (5 हजार जवान) ईशान्य हिंदुस्थानात हलवल्या आहेत. यातील 2000 जवान त्रिपुरात राधानगर आणि धलाई जिह्यात तैनात केले आहेत.
त्रिपुरात सोमवारी अनेक दुकानांना आगी लावण्यात आल्या होत्या. त्रिपुरात बुधवारीही कडकडीत बंद असून तणाव वाढला आहे. मणिपूर, मिझोराम, अरुणाचल प्रदेशातही नागरिकत्व विधेयकाला विरोध सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या