
सामना प्रतिनिधी । नांदेड
केंद्र सरकारने बंदी घातलेल्या सीमी या संघटनेच्या 11 सदस्यांवर नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी नोटीसा बजावल्या आहेत. त्यांच्या हालचालीवर देखील नांदेड पोलिसांचे लक्ष राहणार आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र शासनाने अधिसूचना क्र.एमओ 564 (ई) 31जानेवारी 2019 अन्वये बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंध) अधिनियम 1967 अन्वये सीमी (स्टुडंटस इस्लामीक मुव्हमेंट ऑफ इंडिया) या संघटनेवर बंदी घातली असून, केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार त्यांच्या हालचालीवर नजर ठेवण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर पोलीस ठाण्यातंर्गत 7, शिवाजीनगर ठाण्यातंर्गत 2 आणि इतवारा ठाण्यातंर्गत 2 अशा 11 सीमीच्या कार्यकत्र्यांना संबंधित पोलीस ठाण्याच्या माध्यमातून नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांच्या हालचालीवर देखील नजर ठेवण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. या 11 जणांची नावे मात्र पोलिसांनी गोपनिय ठेवली आहेत.

























































