जोकोविचचे लक्ष्य सहावे विक्रमी जेतेपद, एटीपी फायनल्सचा थरार आजपासून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

या वर्षातील एकेरीतील अव्वल आठ पुरुष टेनिसपटू उद्यापासून लंडन येथे होणाऱया एटीपी फायनल्स या मानाच्या स्पर्धेत एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. याप्रसंगी जगातील नंबर वन टेनिसपटू नोवाक जोकोविच या स्पर्धेच्या सहाव्या विक्रमी जेतेपदासाठी सर्वस्व पणाला लावताना दिसेल.

रॉजर फेडरर याने या स्पर्धेत सर्वाधिक सहा वेळा चॅम्पियन होण्याचा मान संपादन केला आहे, मात्र दुखापतीमुळे तो या स्पर्धेत सहभागी झालेला नाहीए. याचवेळी राफेल नदाल मात्र या स्पर्धेच्या पहिल्यावहिल्या विजेतेपदासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करील.

फेडररचे वर्चस्व

स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर याने 2003, 2004, 2006, 2007, 2010, 2011 या वर्षी ही स्पर्धा जिंकण्याची करामत करून दाखवलीय. तसेच 2005, 2012, 2014, 2015 या सालांमध्ये त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. या स्पर्धेच्या इतिहासावर नजर टाकता रॉजर फेडररचे वर्चस्व प्रकर्षाने दिसून येते.

चार वर्षांनंतर…

नोवाक जोकोविच याने 2008, 2012, 2013, 2014, 2015 या सालांमध्ये या स्पर्धेच्या जेतेपदावर मोहोर उमटवली आहे. पण 2015 सालानंतर त्याला ही स्पर्धा जिंकता आलेली नाही. आता चार वर्षांनंतर तो जेतेपदासाठी जिवाचे रान करील. 2016 व 2018 या सालांमध्ये तो उपविजेता ठरला होता.

एटीपी फायनल्स एकेरी स्पर्धेतील गटवारी

ग्रुप टोकियो 1970

नोवाक जोकोविच

डॅनील मेद्वेदेव

अॅलेक्झॅण्डर झ्वेरेव

दिएगो श्वार्त्झमन

ग्रुप लंडन 2020

राफेल नदाल

डॉमिनिक थीम

स्टेफनोस सितसिपास

आंद्रे रुबलेव