
सामना प्रतिनिधी । मुंबई
भायखळय़ाच्या जिजामाता उद्यानात येणाऱया पर्यटकांना 1 फेब्रुवारीपासून रोज जंगल सफारी घडवणारे थ्री डी फिल्म शो बघता येणार आहेत. ‘ऍनिमल प्लॅनेट’च्या सहकार्याने पालिकेने पर्यटकांसाठी दररोज चार शो आयोजित करण्याचे ठरवले आहे. महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर यांनी आज याबाबतची घोषणा केली.
जिजामाता उद्यानात पेंग्विन आल्यानंतर पर्यटकांना एक पर्वणीच उपलब्ध झाली होती. आता मात्र पर्यटकांसाठी आणखी एक आकर्षण निर्माण झाले आहे. प्राणिसंग्रहालयाच्या नूतनीकरणांतर्गत थ्रीडी थिएटर तयार करण्यात आले आहे. या थिएटरमध्ये वाईल्ड लाईफ दाखवणारे चार शो दररोज दाखवले जाणार आहेत. ‘ऍनिमल प्लॅनेट’ या सुप्रसिद्ध वाहिनीने याकरिता पालिकेला सहकार्य केले आहे. या नव्या उपक्रमाबद्दल आज महापौर महाडेश्वर आणि पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी माहिती दिली. यावेळी डिस्कव्हरी डिजिटल नेटवर्क चॅनेलच्या उपाध्यक्षा झुल्फीया वारिस उपस्थित होत्या.
पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश
पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हे शो मोफत असतील. तर अन्य खासगी शाळांतील विद्यार्थी आणि नागरिक, पर्यटक यांना 50 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.
या फिल्मस् दाखवणार
थ्री डी थिएटरमध्ये रोज 11 ते 5 या वेळात एक एक तासाचे चार शो होणार आहेत. यात ‘इंडिया लेपर्ड हिल्स’, ‘आफ्रिकन वाइल्ड’, ‘मिस्टीरीयस वाइल्डस ऑफ इंडिया’, ‘एक्स्टींक्ट ऑर अलाइव्ह’ आणि ‘स्पीड ऑफ लाइफ’ या जागतिक दर्जाच्या फिल्मस् दाखविण्यात येणार आहेत. तर ‘डिस्कव्हरी चॅनेल’ने सात फिल्मस् या उपक्रमासाठी मोफत दिल्या आहेत.




























































