आता वीरमाता जिजाबाई भोसले ‘वनस्पती’ उद्यान आणि प्राणिसंग्रहालय ! नामविस्तार प्रस्तावाला आयुक्तांची मंजुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या नामविस्तार प्रस्तावाला पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे उद्यानाच्या नावात ‘वनस्पती’ शब्दाचा समावेश करण्यात आला आहे. परिणामी यापुढे उद्यान ‘वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय’ अशा नावाने ओळखले जाणार आहे.

वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात नऊ पेंग्विन, दोन वाघ, शेकडो प्रकारचे पक्षी, हत्ती, हरणे, माकडे, तरस, अजगर आदी प्रकारचे 13 जातीचे 84 सस्तन प्राणी, 19 जातींचे 157 पक्षी आहेत. याशिवाय 283 प्रजातींचे आणि 6611 वृक्ष-वनस्पती आहेत. तर रंगीत करकोचा, छत्रबलाक, विविध प्रकारचे बगळे, सारस असे पाणथळ पक्षीही आहेत. शिवाय या उद्यानात 256 प्रजातींचे 4 हजार 131 वृक्ष आहेत. त्यामधील अनेक वृक्षांचे आयुर्मान हे 100 हून अधिक वर्षे आहे.

उद्यानात मोठय़ा प्रमाणात छोटे सस्तन प्राणी, पक्षी आणि कीटक अशा सजीवांनाही निवारा मिळाला आहे. हे उद्यान मुंबईतील हेरिटेज दर्जा प्राप्त एकमेव वनस्पती उद्यान आहे. याचा अभ्यास करण्यासाठी वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक या ठिकाणी भेट देत असतात. प्राणिसंग्रहालयाच्या आधीपासून या उद्यानाची ‘वनस्पती उद्यान’ ही ओळख आहे. ती मिळवून देण्यासाठी सेव्ह राणीबाग बोटॅनिकल गार्डन फाऊंडेशन गेल्या काही वर्षांपासून प्रयत्नशील होते. प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव बनवून पालिका आयुक्त, प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या मंजुरीसाठी पाठवला होता. त्याला मंजुरी देण्यात आली आहे.

अशी झाली स्थापना

  • उद्यान व प्राणिसंग्रहालयाची स्थापना सन 1861 मध्ये अॅग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेने व्हिक्टोरिया गार्डन्स या नावाने वनस्पती उद्यान म्हणून केली. तत्कालीन ब्रिटिश राजवटीचा हा पहिलाच सार्वजनिक प्रकल्प होता.
  • 1890 साली या उद्यानात प्राणिसंग्रहालयाची सुरू करण्यात आल्याने हे उद्यान अतिशय लोकप्रिय झाले. 1969 मध्ये उद्यानाचे नाव वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान असे झाले, तर 1980 मध्ये वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय असे ठेवण्यात आले.