मोदी सरकार गुन्हेगारीसमोर हरले; देशात महिला, मुलांवरील अत्याचार, सायबर गुन्हेगारीत वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तीन राज्यांत भाजपने छप्पर फाडके यश मिळवले, परंतु मोदी सरकार गुन्हेगारीसमोर हरल्याचे समोर आले आहे. 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये महिला, मुलांवरील अत्याचार, लैंगिक छळ प्रकरणांतील गुन्हे, राजद्रोहाचे गुन्हे तसेच सायबर गुन्हेगारीत प्रचंड वाढ झाल्याचे उघड झाले आहे.  एकीकडे निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपकडून विजयोत्सव सुरू असताना दुसरीकडे एनसीआरबीच्या माध्यमातून गुपचूप वार्षिक गुन्हे अहवाल 2022 प्रसिद्ध करण्यात आला. परंतु, हा अहवाल प्रसिद्धी माध्यमांच्या हाती लागला आणि मोदी सरकार गुन्हेगारी थांबवण्यात सपशेल अपयशी ठरल्याचे समोर आले.

निकालाच्या दिवशीच नॅशनल क्राईम रेकॉड्स ब्युरो आणि अपघाती मृत्यू तसेच आत्महत्यांबाबतचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. 2022 मध्ये हे अहवाल ऑगस्टमध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. देशभरात आकस्मिक मृत्यूच्या प्रमाणात 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये 11.6 टक्क्यांची वाढ झाली आहे.

देशभरात 25 टक्के राजद्रोहाचे गुन्हे

देशभरात नोंदवल्या गेलेल्या एकूण राजद्रोहाच्या गुह्यांपैकी 25 टक्के गुन्हे हे एकटय़ा पश्चिम बंगालमध्ये नोंदवले गेले, तर उर्वरित 75 टक्के गुन्हे जम्मू-कश्मीर, मणिपूर, आसाम आणि उत्तर प्रदेश या राज्यांत नोंदवले गेले होते.

आत्महत्यांमध्येही वाढ

2021 च्या तुलनेत 2022 मध्ये आत्महत्येतही लक्षणीय वाढ झाल्याचे समोर आले आहे. 2021 मध्ये 1,64,033 इतक्या आत्महत्या झाल्या होत्या. 2022 मध्ये हेच प्रमाण 1,70,924 वर गेले. तर अपमृत्यूमध्येही वाढ दिसली. 2021 मध्ये 3,97,530 अपमृत्यू होते. तर 2022 मध्ये हेच प्रमाण 4,30,504 इतके होते. महिलांवरील अत्याचार, लैंगिक छळाच्या गुह्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ दिसत आहे. पती आणि नातेवाईकांनी केलेल्या छळाप्रकरणी दाखल गुह्यांचे प्रमाण 31.4 टक्के असून महिलांच्या अपहरणांप्रकरणी दाखल गुह्यांचे प्रमाण 19.2 टक्के आणि महिलांच्या विनयभंगप्रकरणी दाखल गुह्यांचे प्रमाण 18.7 टक्के तसेच बलात्काराच्या गुह्यांचे प्रमाण 7.1 टक्के असल्याचे नॅशनल क्राईम रेकॉड्स ब्युरोच्या अहवालात म्हटले आहे.

दर तासाला तीन हत्या

2022 मध्ये देशभरात हत्या प्रकरणातील तब्बल 28,522 एफआयआर नोंदवण्यात आले असून दिवसाला 78 हत्या होत असल्याचे नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या अहवालातून समोर आले आहे. 2022 मध्ये 9,962 हत्या या किरकोळ कारणातून झाल्या, तर 3,761 हत्या या  सूड आणि वैमनस्यातून झाल्या तर 1,884 हत्या एखाद्या गोष्टीच्या हव्यासातून घडल्या.

देशभरात एक लाख लोकसंख्येमागे 2.1 हत्या तर 81.5 प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आल्याचे एनसीआरबीच्या अहवालात म्हटले आहे.

8,125 हत्या प्रकरणांत महिला बळी ठरल्या आहेत, तर 70 टक्के प्रकरणांत पुरुष बळी ठरले आहेत. 95.4 टक्के हत्या प्रकरणांत ज्येष्ठ नागरिक बळी ठरले आहेत.