
सामना प्रतिनिधी । नेवासा
नामांतराला विरोध केल्याचा रागातून चेंबरमध्ये कोंडून माजी आमदार घुले बंधू व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवीगाळ करीत मारहाण केल्याची तक्रार नेवासा पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर पाडळे यांनी दिली आहे. त्यावरून घुले बंधूंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
19 ऑक्टोबर 2018 रोजी ‘श्री ज्ञानेश्वर सह. साखर कारखाना’ भेंडे, ता नेवासा, जिल्हा नगर या सहकारी साखर कारखान्याचे ‘श्री मारुतराव घुले-पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना’ असे नामांतर करण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याला कारखान्याचे एक सभासद ज्ञानेश्वर पाडळे यांनी विरोध केला होता. त्याचा राग मनात धरून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार, चेअरमन चंद्रशेखर घुले पाटील, सभेचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, यांच्यासह विलास दत्तात्रय लोखंडे, छबुभाई इम्रान शेख, बशीर उर्फ बंडूभाई चांदुभाई शेख व इतर पाच सहा जणांनी आपल्याला कार्यालयातील दालनामध्ये बोलावून घेतले. त्या ठिकाणी शिवीगाळ करीत मारहाण केली आणि कोंडून ठेवले, अशी तक्रार मंगळवारी रात्री उशिरा नेवासा पोलिसात दाखल करण्यात आली. त्यावरून नेवासा पोलिसांनी घुले बंधू सह इतराविरुद्ध अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.































































