
भाजपचे नेते, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी समाजमाध्यमावर आक्षेपार्ह भाषेत पोस्ट केल्या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कोथरुड पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
सचिन 1414 नावाच्या सोशल मीडिया अकाउंट असणाऱ्या व्यक्तीसह तिघांच्या विरोधात माहिती-तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सनी किरण लांडे यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. चंद्रकांत पाटील यांच्या विषयी आक्षेपार्ह भाषा वापरून ध्वनिचित्रफीत तयार करून प्रसारित करण्यात आल्याचे लांडे यांच्या पाहण्यात आले. अखेर त्यांनी पोलिसांकडे याप्रकारासंदर्भात तक्रार दिली. ध्वनिचित्रफीमध्ये दोघे जण आक्षेपार्ह भाषेत पाटील यांच्या विषयी वक्तव्य करत असल्याचे आढळून आले आहे. ज्या अकाउंटवरून हे प्रसारित करण्यात आले आहे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याआधी चंद्रकांत पाटील यांच्या विषयी बदनामीकारक मजकूर आणि शिवीगाळ करणारा मजकूर प्रसारित केल्या प्रकरणी वारजे आणि कोथरुड पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.




























































