
वजन काटय़ांचे मुद्रांकन व प्रमाणीकरण करण्यासाठी आठ हजारांची लाच मागून ती रक्कम स्वीकारताना वैद्यमापन शास्त्र विभागाचे निरीक्षक विशाल भोईर यांना अॅण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहाथ पकडले. कारवाई वेळेस पोलिसांनी भोईर यांच्या लॅपटॉपच्या बॅगेची तपासणी केली असता त्यात 46 हजारांची रोकड मिळून आली.
शैलेंद्र (नाव बदलेले) हे वजन काटा मापे दुरुस्ती व मुद्रांकन परवानाधारक आहेत. ते शासनाच्या पोर्टलवर वजन काटे मुद्रांक व प्रमाणीकरणासाठी शासनाचा ऑनलाइन भरणा करतात. पैसे भरल्यानंतर शैलेंद्र वैद्यमापन शास्त्र मुलुंड विभागातील निरीक्षक यांच्या कार्यालयात जाऊन वजन काटे मुद्रांकित करून त्याबाबतचे प्रमाणपत्र घेतात. त्याचप्रमाणे 22 ऑक्टोबर रोजी शासनाचे ऑनलाइन पैसे भरल्यानंतर वजन काटे मुद्रांकित व प्रमाणित करण्यासाठी शैलेंद्र हे भोईर यांच्या कार्यालयात गेले होते. तेव्हा भोईर यांनी प्रत्येक काटय़ाचे 400 रुपयेप्रमाणे पैशांची मागणी केली. शैलेंद्र यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी अॅण्टी करप्शन ब्युरोकडे धाव घेतली. शैलेंद्र यांनी तक्रार दिल्यानंतर अॅण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने तक्रारीची खातरजमा केली असता भोईर यांनी आठ हजारांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज भोईर यांना शैलेंद्र यांच्याकडून आठ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.
सतीश पाटीलचा शोध सुरू
पोलिसांनी भोईर यांच्या लॅपटॉप बॅगेची तपासणी केली. तेव्हा बॅगेत चार बंद लिफाफ्यांत एकूण 46 हजारांची रोकड मिळून आली. त्या पैशांबाबत भोईर यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. याप्रकरणात वैद्यमापन शास्त्र विभागाचे क्षेत्र सहाय्यक सतीश पाटील यांचा पोलीस शोध घेत आहेत.

























































