नातेवाईक असल्याचे भासवून वृद्धाची केली फसवणूक

नातेवाईक असल्याचे भासवून वृद्धाची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना घडली आहे. फसवणूकप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार हे अंधेरी परिसरात राहत असून ते सेवानिवृत्त आहेत. मार्च महिन्यात त्यांना मोबाईलवर एक व्हॉट्सअप मेसेज आला होता. त्यावर तक्रारदार यांच्या नातेवाईकाचा फोटो होता. तो फोटो पाहून तक्रारदारांनी त्या मेसेजला रिप्लाय दिला. त्यानंतर तक्रारदारांना आपल्या जवळच्या मित्राला 3 लाख रुपयाची गरज असून तो लवकर पैसे देईल असे त्यांना सांगण्यात आले. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदारांनी त्याच्या पत्नीचे दागिने गहाण ठेवून पैसे एका बँक खात्यात जमा केले. पैसे जमा केल्यावर तक्रारदारानी त्या नातेवाईकाला फोन करून पैसे मिळाल्याबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने आपल्याला पैसे मिळाले नसल्याचे सांगितले. फसवणुकीचा प्रकार समोर येताच तक्रारदारांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. ओशिवरा पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या