सोशल मीडियावर वृद्धच अफवा पसरवतात !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

फेसबुक आणि अन्य सोशल मीडियावर पसरणाऱया खोटय़ा मेसेजला कसा आळा घालायचा. यावर जगभरात चर्चा होत असताना आता वेगळीच माहिती हाती आली आहे. सोशल मीडिया हे तरुणाईच्या अत्यंत जवळचे माध्यम असले तरी त्याचा वापर करून अफवा आणि खोटय़ा बातम्या पसरवण्याचे काम वृद्ध मंडळीच जास्त करीत आहेत. अमेरिकेच्या विद्यापीठांनी केलेल्या संशोधनातून ही बाब उघड झाली आहे.

अमेरिकेतील 2016 सालच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत फेक न्यूज अधिक शेअर झाल्या. या पार्श्वभूमीवरचा अहवाल जर्नल सायन्स ऍडवान्समध्ये प्रकाशित झाला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क युनव्हर्सिटी आणि प्रिसेटोन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हा अभ्यास केला आहे. अभ्यासात असे आढळून आलंय की फक्त 8.5 टक्के लोकांनी फेसबुकवरील फेक न्यूज साइटवरून मेसेज शेअर केले आहेत. 18 ते 29 वर्षे वयोगटातील तरुणांनी बनावट वेबसाइटवरून 3 टक्के खोटय़ा बातम्या शेअर केल्या आहेत, तर 11 टक्के खोटय़ा बातम्या या 65 वर्षांवरील व्यक्तींकडून शेअर झाल्या .

वृद्धांकडूनच जर खोटय़ा बातम्या अधिक प्रमाणात सोशल मीडियावर शेअर होत असतील तर कशा पद्धतीने मार्ग काढावा लागेल यावर आता संशोधकांना विचार करावा लागणार आहे. अमेरिकेच्या निवडणुकीतील ज्येष्ठांनी केलेल्या प्रकार म्हणजे त्यांची विचारधारा किंवा विशिष्ट व्यक्ती वा पक्षाशी असलेली एकनिष्ठता आहे, असेही संशोधकांना वाटत आहे. फेक न्यूज पसवरण्याला आळा घालण्यासाठी हे वयाचे फॅक्टर खूप महत्त्वाचे असल्याची प्रतिक्रिया प्रिन्सटोन युनिर्व्हसिटीचे ऍण्ड्रय़ू गेस यांनी दिली.

डिजिटल साक्षरता महत्त्वाची
सोशल मीडियाच्या वापराबद्दल नागरिकांमध्ये जागृती करण्याची गरज यानिमित्ताने अधोरेखित झाली आहे. शाळांपासून या उपक्रमाची सुरुवात झाली पाहिजे, मात्र जर वयोवृद्ध माणसंच खोटय़ा बातम्या पसरवण्याचे काम करीत असतील तर डिजिटल साक्षरता कितपत उपयुक्त ठरेल याविषयी शंकाच आहे, असे मत न्यूयॉर्क विद्यापीठाचे प्राध्यापक जोनाथन नागलेर यांनी व्यक्त केले आहे.