
मेरठमध्ये जगन्नाथ रथयात्रेदरम्यान मोठी दुर्घटना घडली. मिरवणुकीदरम्यान वीजेचा धक्का लागून एका भाविकाचा मृत्यू झाला तर 9 जण भाजल्याने जखमी झाले आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या मते, त्यांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे.
टीव्ही 9 भारतवर्षने दिलेल्या वृत्तानुसार, मिरवणुकीदरम्यान रथाचा उच्चदाब वीज वाहिनीला स्पर्श झाला. त्यामुळे रथाला आणि आजूबाजूच्या भाविकांना विजेचा धक्का बसला. या अपघातात एका भाविकाचा मृत्यू झाला, तर नऊ जण भाजले.
पावसामुळे वीज वाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. रथावर लावलेल्या ध्वजाचा वाहिनीला स्पर्श होताच, संपूर्ण रथात विद्युत प्रवाह पसरला आणि जवळून चालणाऱ्या भाविकांना विजेचा धक्का बसला. या घटनेमुळे घटनास्थळी घबराट पसरली आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली.



























































