
मुसळधार पावसाने गुजरातमध्ये हाहाकार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे नद्या, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अशातच आता ओव्हरफ्लो नाल्यात एक कार बुडाल्याची घटना समोर आली आहे. भरधाव कार नाल्यात पडून चार जणांचा मृत्यू झाला आहे. सुदैवाने कारमधील दोघांना वाचवण्यास यश आले आहे. कारमधील सर्वजण अहमदाबादचे रहिवासी होते. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, खेडा-मातर महामार्गावर गुरुवारी रात्री उशिरा मोतीपुरा गावाजवळ हा अपघात घडला. सहा जणांना घेऊन जाणारी कार तुडुंब भरलेल्या नाल्यात कोसळली. काही क्षणांतच कार पाण्याच्या जोरदार प्रवाहाने वाहून जाऊ लागली. घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत इतर दोघांना सुखरूप बाहेर काढले. दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी चारही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी खेडा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवले. प्रशासन अपघाताच्या कारणाचा तपास करत आहे. प्राथमिक माहितीनुसार, सततचा पाऊस आणि नाल्यातील जोरदार प्रवाह ही अपघाताची मुख्य कारणे असल्याचे मानले जात आहे.

























































