फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, दोघांचा मृत्यू; अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यात फटाक्यांच्या कारखान्यात शुक्रवारी मोठा स्फोट झाला. या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला तर अनेक जण ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्नीशमन दल आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलीस, अग्निशमन दल आणि प्रशासकीय पथके घटनास्थळी दाखल झाली असून त्यांनी बचावकार्य सुरू केले आहे.

टीव्ही 9 भारतवर्षने दिलेल्या वृत्तानुसार, कारखान्यात अचानक मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर आग लागली. स्फोटामुळे कारखान्याचा काही भाग पूर्णपणे कोसळला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दुर्घटनेच्या वेळी अनेक कामगार आत काम करत होते. स्फोट इतका शक्तिशाली होता की, काही कामगारांचे मृतदेह दूरवर फेकले गेले. या दुर्घटनेनंतर संपूर्ण परिसरात घबराट पसरली आहे.

स्फोट इतका तीव्र होता की, जवळची घरे आणि झोपड्यांनादेखील हादरे बसले. स्फोटानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आणि जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. प्रशासनाने दोन जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. कारखान्याच्या ढिगाऱ्याखाली अजूनही अनेक लोक अडकले असण्याची भीती आहे. घटनास्थळी मोठ्या संख्येने पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. स्फोटाच्या कारणांची चौकशी सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.