
सामना प्रतिनिधी । येवला
तालुक्यातील राजापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘एक मुलगी, एक झाड’ हा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मंगळवारी गावातून ढोल ताश्याच्या गजरात वृक्ष दिंडी काढून विविध घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या. झाडासारखा पोषाख परिधान करून मुले दिंडीत सहभागी झाली होती.
शाळेत वृक्षारोपण व मागील वर्षी लावलेल्या झाडांचा प्रथम वाढदिवस साजरा करण्यात आला. मागील वर्षी लावलेल्या झाडाचे पूजन करून माता पालक समिती अध्यक्षा अर्चना सोनवणे, ज्योत्स्ना पाटील यांच्या हस्ते केक कापण्यात आला. झाडाची सजावट करून त्यांना फुगे लावण्यात आले. पालक व त्यांच्या मुलांनी 11 झाडांची जबाबदारी स्वतः घेतली. ज्या मुलांचे झाड एका वर्षात जास्त वाढेल त्याला १०० रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भाऊसाहेब भाबड व इतर सर्व सदस्य, केंद्रप्रमुख नीलेश जाधव, रंजना वाघ, गायत्री घुगे, संतोष सोनवणे, संतोष चव्हाण कविता मांजरे, चिंधूभाऊ जाधव, योगेश जगताप, नारायण शिंदे, श्रीराम दराडे, दत्तू चव्हाण उपस्थित होते.






























































