कारच्या धडकेत तरुण ठार, पाच जण जखमी

सामना ऑनलाईन । मुंबई

भरधाव कारने सहा पादचाऱ्यांना धडक दिल्याची घटना रविवारी शिवडी येथील जकेरिया बंदर परिसरात घडली. या अपघातात दर्पण दीपक पाटील (18) हा तरुण ठार झाला, तर त्याची आई आणि बहिणीसह अन्य तीन पादचारी गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल केले आहे. स्वाती पाटील (40), निधी पाटील (12), कल्पेश घरसे (25), गौरी नांदवकर (40) आणि जय मांडवकर (13) अशी जखमींची नावे आहेत. शाहबाज ऊर्फ वाडी (26) हा त्याच्या पत्नीसोबत मारुती आर्टिगा कारने जात असताना जकेरिया बंदर बस स्टॉपजवळ त्याचे गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि त्याने सहा जणांना धडक दिली.

जुहू, मरीन ड्राइव्ह बीचवर दोघे बुडाले
मरीन ड्राइव्ह आणि जुहू बीचवर मौजमजा करण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेजण बुडाल्याची घटना घडली. रविवारी दुपारच्या सुमारास या घटना घडल्या. अंधेरीत सीप्झ परिसरात राहणारे महेश शिंदे (40) हे त्यांचे कुटुंबीय आणि शेजारच्या मुलांना घेऊन जुहू बीचवर गेले होते. दुपारी अडीचच्या सुमारास मुलांना बाहेर उभे करून महेश पोहण्यासाठी समुद्रात थांबले, पण पाण्याचा अंदाज न आल्याने ते लाटांनी आत ओढले गेले. हा प्रकार कळताच पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी सायंकाळी 5.30 च्या सुमारास महेश शिंदे यांचा मृतदेह बाहेर काढला. जुहू येथे ही घटना घडत असताना मरीन ड्राइव्ह येथील समुद्रात भैरव रमेश बरिया (11) या मुलाचा बुडून मृत्यू झाला. भैरव बुडाल्याचे समजताच त्याला समुद्राबाहेर काढून जी. टी. रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

बेस्ट बसच्या चाकाखाली सापडून तरुण ठार
ओव्हरटेक करताना स्कुटीवरचा ताबा सुटून चालक बेस्ट बसच्या मागच्या चाकाखाली सापडून मृत्युमुखी पडल्याची घटना रविवारी आग्रीपाडा येथे घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी बेस्ट बसचालकाला अटक केली आहे. अनिकेत कांगणे (19) असे मृत तरुणाचे नाव आहे. ताडदेव येथे राहणारा अनिकेत त्याच्या भावासोबत स्कुटीवरून काही कामानिमित्त सात रस्त्याच्या दिशेने जात होता. दुपारी तीनच्या सुमारास नायर रुग्णालयाजवळील क्लासिक टॉवरजवळ अनिकेतने बसला डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याचे स्कुटीवरील नियंत्रण सुटले आणि तो बसच्या मागच्या चाकाखाली आला. बसने चिरडल्याने अनिकेतचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी बसचालक अशोक पवार याला अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या