वृद्ध, महिलांना मदतीच्या नावाने फसविणारे भामटे गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । मुंबई

एटीएम सेंटरमध्ये वृद्ध किंवा महिला असल्यास त्यांना पैसे काढून देण्यास मदत करतो अशी बतावणी करीत एटीएम कार्ड चोरून त्याआधारे लाखो रुपये काढणाऱ्या तिघांच्या शिवाजीनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्या भामटय़ांकडून पोलिसांनी मोठय़ा प्रमाणात एटीएम कार्डस् हस्तगत केली आहेत.

शिवाजीनगर परिसरात राहणारी सुलताना मुल्ला (37) ही महिला त्याच परिसरात असलेल्या एका एटीएम सेंटरमध्ये गेली होती. पैसे निघत नाही म्हणून तेथे उभ्या असलेल्या एका अज्ञात तरुणाकडे तिने मदत मागितली. त्यावेळी तो तरुण तिला पैसे काढण्यास मदत करू लागला. पण त्याने महिलेने टाकलेला पिनकोड पाहिला आणि शिताफीने तिची नजर चुकवून तिचे एटीएम कार्ड आपल्या खिशात टाकले. मग बनावट एटीएम कार्ड महिलेला देऊन तेथून पोबारा केला. त्यानंतर थोडय़ाच वेळाने सुलतानाच्या मोबाईलवर पैसे काढल्याचा मेसेज आला. एटीएम कार्ड आपल्याजवळ असताना पैसे काढले गेल्याने तिने लगेच बँकेत धाव घेतली. तेव्हा तिच्याजवळ असलेले एटीएम कार्ड बोगस असून कोणीतरी लबाडीने तिच्या खऱ्या एटीएम कार्डचा वापर केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सुलतानाने लगेच शिवाजी नगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी लगेच शोधाशोध सुरू केली. परिसरातील सीसीटीव्ही तपासून खबऱयांना कामाला लावले. आरोपी मालाड येथे असल्याचे समजताच पोलिसांनी तेथे जाऊन शिवप्रताप सिंग, जितेंद्र सिंग, विजय चव्हाण या तिघांना पकडले. आरोपींनी गुह्याची कबुली दिली.

हे तिघेही सराईत गुन्हेगार असून त्यांनी अशाप्रकारे अनेकांना फसवल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.