
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबईतली घर खरेदी-विक्रीसाठी द्याव्या लागणाऱ्या स्टॅम्प ड्युटीमध्ये एक टक्क्याची वाढ करणारे विधेयक गुरुवारी विधान परिषदेतही मंजूर करण्यात आले होते. मंगळवारी या विधेयकाला विधानसभेत मंजुरी देण्यात आली होती. हे विधेयक विधान परिषदेत मंजुरीसाठी येताच विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला. हे विधेयक मंजूर करणे सरकारला भारी पडेल. आगामी निवडणुकीत जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशा शब्दांत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले.
सध्या स्टॅम्प ड्युटी पाच टक्के आहे. यात आणखी एक टक्का अधिभार द्यावा लागणार आहे. हे विधेयक मंजुरीसाठी आल्यानंतर राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण यांनी सुरुवातीलाच या विधेयकाला विरोध केला. मुंबईत घर घेताना अनेक अडचणी येतात. अशा वेळी सरकार स्टॅम्प ड्युटी वाढवून त्यात आणखी अडचणी आणू पाहत आहे असा आरोप त्यांनी केला. प्रकाश गजभिये यांनीही मुंबईतून मध्यमवर्गीय आणि गरीबांना हाकलण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप केला. काँग्रेसच्या सुभाष झांबड यांनीही सरकारला धारेवर धरले. त्यानंतर शेवटी हे विधेयक पटलावर मांडण्यात आले आणि सर्वानुमते ते मंजूर करण्यात आले.






























































