धाराशीव – कळंब शहरात पोलीसांनी पकडल्या बनावट नोटा, एकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धाराशीव जिल्ह्यातील कळंब शहरात दोनशे, पाचशेच्या बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलीसांना यश आले आहे. याचे मुख्य कनेक्शन लातुर शहरात असुन लाखोंच्या बनावट नोटा चलनात आल्याने मोठी खळबळ माजली आहे. या प्रकरणी कळंब पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

कळंब शहरात बनावट नोटांचे रॅकेट गेल्या अनेक दिवसापासून चालू होते. दोनशे तसेच पाचशे रूपयांचे बनावट चलन बाजारात फिरु लागल्याने अनेकांना धक्का बसला व व्यापारी ग्राहक संशयाने एकमेकाकडे पाहु लागले. परंतु एका व्यापाऱ्याने कळंबचे पोलीस निरिक्षक तानाजी दराडे यांना बनावट नोटा बाजारात चलनात आल्याचे गेल्या चार पाच दिवसापुर्वीच सांगितले. पोलिसांनी सापळा रचून शुक्रवारी मध्यरात्री पोलीस निरिक्षक तानाजी दराडे, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी राऊत, एस. एल. हांगे, अमोल जाधव, कुवळेकर, रेखा काळे यांनी असरफअली तायरअली सय्यद (25, रा. बाबा नगर कळंब) या आरोपीला पळुन जात असताना शहरात पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 500 च्या 3 व 200 रुपयाच्या 5 बनावट नोटा मिळाल्या. पोलीसांनी घराची झडती घेतली असता आणखी पाचशे व दोनशेच्या बनावट नोटा पोलिसांना मिळाल्या असुन रात्री उशीरा कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बनावट नोटांचा बाजारात सुळसुळाट, व्यापारी धास्तावले

या बनावट नोटाच्या रॅकेटचे धागेदोरे शोधण्यात पोलीसांना यश आले आहे. मात्र यातील मुख्य सुत्रधार पोलीसांच्या हाती लागला नाही. या रॅकेटचे लातुरशी कनेक्शन असुन मुख्य आरोपीला पकडण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हाण आहे. शहरात लखोंच्या बनावट नोटा चलनात बाजारात फीरल्याने व्यापाऱयासह ग्राहक धास्तावले आहेत.