
सामना ऑनलाईन । बंगळुरु
तेलंगणा विधानसभा निवडणुकीत जिंकण्यासाठी काही राजकारण्यांकडून घुबडाचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तेलंगणाच्या सीमाभागावर असलेल्या कलबुर्गी जिल्हय़ातील सेदाम तालुक्यातून पोलिसांनी घुबड तस्करी करणाऱ्या 6 जणांना ताब्यात घेतले होते. हे घुबड तेलंगणाच्या नेत्यांनी विरोधकाला पराभूत करण्यासाठीच्या काळ्या जादूसाठी मागविल्याची माहिती तपासात मिळाल्याने खळबळ उडाली आहे.
सेदाममध्ये तस्करांकडून पकडण्यात आलेल्या घुबडाचा वापर काळी जादू करुन निवडणूक जिंकण्यासाठी करण्यात येणार होता, अशी माहिती मिळली आहे. येत्या 7 डिसेंबर रोजी तेलंगणात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. सर्वच पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. तसेच प्रचारसभांमधून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील केले जात आहेत. मात्र प्रचाराव्यतिरिक्त निवडणूक जिंकण्यासाठी काळ्या जादूतंत्राचा हा वेगळाच प्रकार अवलंबल्याने खळबळ उडाली आहे.
कर्नाटकात घुबड तस्करांचे नेटवर्क
कर्नाटकमध्ये घुबड तस्करी करणाऱ्यांचे मोठे नेटवर्क आहे. या घुबडांची किंमत लाखांच्या वर असते. तस्करांकडून तेलंगणात नेले जाणारे घुबड तीन ते चार लाख रुपयांपर्यंत विकले जाणार होते, अशी माहिती वनविभागाच्या सुत्रांनी दिली आहे. घुबडाला इंग्लंडमध्ये बुद्धिमत्तेचे प्रतीक तर हिंदुस्थानात अशुभ मानले जाते. हिंदुस्थानातील काही भागात काळ्या जादुच्या तंत्रासाठी घुबडाचा वापर केला जातो. घुबडांच्या माध्यमाने एखाद्या व्यक्तिला वश करता येते, अशी अंधश्रद्धा काही समाजात आहे. त्यामुळे घुबडाचा अशाप्रकारे गैरवापर केला जात असल्याने तेलंगणाच्या राजकारणात आगळी चर्चा रंगली आहे.

























































