लेख – भाषा मरता देशही मरतो!

>> प्र. ह. दलाल

कवी श्रेष्ठ कुसुमाग्रजांनी त्यांच्या ‘स्वातंत्र्यदेवीची विनवणी’ या गाजलेल्या कवितेत म्हटले आहे, ‘भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे, गुलाम आणिक होऊन, अपुल्या प्रगतीचे शिरकापू नका!’ मराठी भाषेच्या सद्यःस्थितीचे वर्णनही त्यांनी अत्यंत समर्पक शब्दात केले असून ते म्हणतात, ‘मराठी’ आज राजभाषा झाली खरी, पण आजही डोक्यावर राजमुकुट, अंगात फाटके कपडे घालून ती मंत्रालयाच्या दाराशी उभी आहे!

स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना होऊनही अर्धशतक पार पडले, पण मराठीला आपल्या हक्काचे सिंहासन मात्र अद्याप मिळालेले नाही. शासनकर्त्यांची उदासीनता जेवढी जबाबदार आहे, तेवढीच जनतेची मानसिकताही जबाबदार आहे. शासनाने केवळ शासकीय कामकाजासाठीच मराठी मर्यादीत न ठेवता तिला ज्ञानभाषा केली पाहिजे. ज्ञानार्जन, ज्ञान-संवर्धनासह सर्व व्यवहारांसाठी तिचा वापर वाढविला पाहिजे. मुख्य म्हणजे आपण इंग्रजीवर किती काळ विसंबून राहायचे, तिचा किती उदोउदो करायचा आणि आपलाच न्यूनगंड कितीकाळ कुरवळत बसायचा. याचा आपण सर्वांनीच गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.

समाजाच्या सर्वांगीण प्रगतीची बीजे स्व-भाषेच्या पाण्यावरच पोसली जातात. भाषा म्हणजे केवळ शब्दांचे संकलन नव्हे, समाजाचे वैचारिक व जाणिवात्मक संचित काळातून पुढे नेणारी व परिणामतः समाजाच्या बदलत्या जीवनाला अखंडता, आकार व आशय देणारी भाषा ही एक महाशक्ती असते. सूत्रात ओवलेल्या मण्यांप्रमाणे समाजजीवनाच्या साऱ्या धारणा व विकासाच्या प्रेरणा तिच्यात ओवलेल्या असतात. म्हणून मराठीवरील संकट हे केवळ तिच्या साहित्यावरील संकट नाही तर ते महाराष्ट्राच्या अस्मितेवरील आणि मराठी भाषकांच्या भवितव्यावरीलही संकट आहे.

मराठीवरील सर्वात मोठे संकट आहे ते शिक्षणाच्या क्षेत्रात. इंग्रजीचा आश्रय घेतल्याशिवाय आपल्या वंशाचे दिवे लखलखणारच नाहीत असा पालकांचा फार मोठा गैरसमज झाला आहे. तो दूर करण्याचे घटनादत्त कर्तव्य करण्याऐवजी शासनकर्तेही 1 लीपासून इंग्रजी, सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांना मुक्त हस्ते प्रोत्साहनच देत आहे. मराठी शाळांचा दर्जा व गुणवत्तेसंबंधी निर्माण झालेली साशंकता, मराठीच्या व्यावहारिक उपयोजितेवर निर्माण झालेले प्रश्नचिन्ह, इंग्रजी शाळांच्या बाह्य चकाचक रंगरूपामुळे निर्माण झालेले आकर्षण, इंग्रजी भाषेतून शिकणे म्हणजे प्रतिष्ठतपणा. गरीब लोकच मराठी माध्यमातून आपल्या मुलांना शिकवितात ही लोकप्रिय अफवा आणि स्पर्धेसाठी इंग्रजीच हवी हा गैरसमज इ. कारणांनी आज मराठी माध्यमातील शिक्षणालाच घरघर लागली असल्याचे जाणवते.

खरं म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा मनःपिंड हा मातृभाषेतूनच घडविला जातो. अंतःकरणातील भाव-भावनांचा प्रामाणिक उद्रेक होतो तोही मातृभाषेतूनच, म्हणून तर मातृभाषेला हृदयाची भाषा म्हणतात. मुलांच्या बुद्धी आणि आकलनशक्तीचा विकासही मातृभाषेच्या साहचऱ्यानेच होतो. त्याचे भावनात्मक व सांस्कृतिक जीवनही मातृभाषेशिवाय सखोल व सर्वांगीण विचार करूच शकत नाही. विचार करणे म्हणजे मनोमय बोलणेच. इंग्रजी शब्द हे कल्पनांचे प्रतिक आणि वाहक असतात. या शब्दांच्याच साहाय्याने मनुष्य अमूर्त पातळीवर विचार करू शकतो. भाषा प्रभुत्व, शब्द संपदा हा बुद्धीचाच एक भाग असतो. मुलांचा वैचारिक, बौद्धिक, मानसिक व भावनिक विकास हा त्याच्या भाषिक विकासावरच अवलंबून असतो.

एका सामाजिक संस्थेने मुंबई, पुणे, नागपूर, दिल्ली अशा अनेक मोठय़ा शहरांतील इ. 5 वी ते एबीच्या नामांकित शाळांतील सुमारे 32 हजार विद्यार्थ्यांचे एका परीक्षेद्वारा मिळालेले निष्कर्ष वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले होते. त्यानुसार या विद्यार्थ्यांचे विषयज्ञान अगदी वरवरचे होते. त्यांची सर्व मदार पाठांतरावरच होती. अभिव्यक्तीतही त्रोटकपणा होता. मातृभाषेतूनच मूलभूत संकल्पना अधिक स्पष्ट होतात. इंग्रजीत फक्त रटवण, घटवणच होत. घरी मराठी व शाळेत इंग्रजी यामुळे मुलांची भावनिक व बौद्धिक घुसमटच अधिक होते. वैचारिक बैठक सुसंगत नसेल तर आकलन, अभिव्यक्ती, पूर्णतः विकसित होत नाही. हजारो वर्षांपूर्वी हिंदुस्थानी ऋषीमुनींनी शून्याचा शोध, वर्ग-वर्गमूळ, घनमूळ सूत्रे, प्लॅस्टिक सर्जरी, खगोलशास्त्र्ा, रसायनशास्त्र्ा, इ. विविध ज्ञान क्षेत्रांत नेत्रदीपक कामगिरी केली आहे. नालंदा, तक्षशीला, इत्यादी विद्यापीठांत जगभरातून विद्यार्थी येत असत. तेव्हा काय इंग्रजी माध्यम होते? आजही अग्रगण्य वैज्ञानिक, डॉक्टर, वकील, इंजिनीअर अशा अनेक तज्ञांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या मातृभाषेतूनच झालेले आहे.

जपान, जर्मनी, फ्रान्स, रशिया, चीन, यांसह युरोपमधील अनेक देशांत इंग्रजीतून नव्हे तर त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण दिले जाते. तरीही त्यांची अनेक क्षेत्रांत प्रचंड प्रगती झालेली आहेच ना? याबाबत जपानचे उदा. कौतुकास्पद आहे. त्यांनी पाश्चात्य ज्ञान, विज्ञान, वाङ्मयाचा कसून अभ्यास केला. ते ज्ञान स्व-भाषेत आणले, पण शिक्षणाचे माध्यम मात्र मातृभाषाच ठेवले. त्यामुळे नवी पिढी अधिक सक्षम घडली. जपानने विज्ञानात पाच नोबेल पारितोषिके मिळविलीत. अन् आपण? न समजणाऱ्या इंग्रजी शब्दांचा भडिमार करून त्यांचे सक्तीने पाठांतर करवून त्यांची बौद्धिक वाढच संपवून टाकतो.

आज अनेक विद्वानांनी संगणकासाठीही मराठी सक्षम असल्याचे म्हटले आहे. ‘युनिकोड’ या फॉण्टमुळे संगणकावरील तिचे अस्तित्व अधिक ठळक झाले आहे, तर ‘विकीपिडीया’सारख्या जगमान्य इंटरनेट माहिती कोशानेही मराठीचा पर्याय उपलब्ध करून द्यावा यातच मराठीच्या श्रेष्ठत्त्वाचे गमक आहे. मोजक्या शब्दात, थोडय़ा जागेत जास्त मजकूर हा मराठीचा विशेष गुण आहे. एकच मजकूर इंग्रजीत व मराठीत लिहिल्यास इंग्रजीपेक्षा मराठीत सुमारे 30 ते 40टक्के शब्द कमी लागतात. उदा. चेकवर तेरा कोटी, चौदा लाख, तेरा हजार आठशे लिहून बघा. ‘स्पेलिंग’ हा प्रकार मराठीत नाही. लिहिलेले वाचायचे उच्चारायचे कसे हा प्रश्नही नाही. इंग्रजीत मात्र प्रत्येक शब्दाचे स्पेलिंग लक्षात ठेवावेच लागले. उच्चारानुसार स्पेलिंग नाही, की स्पेलिंगनुसार उच्चार नाही. आणखी एक उदा. म्हणजे मराठीत क्रियापदांचा होणारा वैशिष्टय़पूर्ण वापर. उदा. नाचणे-नाचविणे, बोलणे-बोलविणारे इ. इंग्रजीत मात्र To dance या क्रियापदापासून नाचविणे हे रूप करण्यासाठी To make him dance अशी वाक्यरचना करावी लागते. क्रियापद कर्त्याच्या लिंग, वचनानुसार बदलण्याचा प्रकार इंग्रजीत नाही. उदा. राधा चालते, कृष्ण चालतो. इंग्रजीत मात्र राधा, कृष्ण, गाढव, घोडा सर्वांना walk हेच क्रियापद Radha walks, He walks इत्यादी आम्हाला एवढी सर्वांगसुंदर बहुगुणी भाषा लाभली असताना अन्य कुबडय़ांची गरजच काय?