‘विराटसेना’ लष्कराची कॅप घालून खेळल्याने पाकड्यांचा जळफळाट, ICCकडे तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
virat-sena

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

ऑस्ट्रेलियाविरुद्ध रांचीमध्ये झालेल्या तिसऱ्या एक दिवसीय सामन्यात विराटसेना पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या सन्मानार्थ लष्कराची विशेष कॅप घालून खेळली होती. विराटसेनेने लष्कराची कॅप घालून खेळल्याने पाकिस्तानचा जळफळाट झाला असून त्यांनी आयसीसीकडे या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. तसेच खेळामध्ये राजकारण आणले जात असल्याचा फुटकळ आरोपही पाकिस्तानने लगावला.

team-india

पुलवामा येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे जवान हुतात्मा झाले. या जवानांच्या सन्मानार्थ हिंदुस्थानी क्रिकेट संघाने तिसऱ्या एक दिवसीय सामन्यात लष्करी जवानांना देण्यात येणारी विशेष कॅप घालून सामना खेळला. तसेच एका सामन्याची फी देखील राष्ट्रीय सुरक्षा निधीसाठी दिली. यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महसूद कुरेशी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे.

cap

कुरेशी म्हणाले की, हिंदुस्थानी संघाने लष्कराची कॅप घालून सामना खेळला हे संपूर्ण जगाने पाहिले. परंतु आयसीसीने हे पाहिले नाही का? पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने हे निदर्शनास आणून देण्याआधी आयसीसीने स्वत:हून यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. तसेच आयसीसीने हिंदुस्थानी संघाला असे करण्यापासून परावृत्त केले नाही तर कश्मीरमध्ये हिंदुस्थान करत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात पाकिस्तानी क्रिकेट संघ काळी पट्टी बांधून मैदानात उतरेल, असेही कुरेशी म्हणाले. परंतु कश्मीर हा हिंदुस्थानचा अविभाज्य भाग असून येथे लष्कर प्रत्येक परिस्थितीमध्ये स्थानिकांची काळजी घेत असल्याचे मात्र जगाला माहीत आहे, हे मात्र कुरेशी विसरले. त्यामुळे त्यांचा दावा किती पोकळ आहे हे सिद्ध होते.

fawad

कुरेशी यांच्यासह पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी हिंदुस्थानी संघावर खेळामध्ये राजकारण आणल्याचा आरोप केला. चौधरी यांनी शुक्रवारी ट्वीटरवर म्हटले की, ‘हे फक्त क्रिकेट नाही. आयसीसीने यावर कारवाई करायला हवी. तसेच हिंदुस्थानी संघाने लष्कराची कॅप घालणे बंद न केल्याच पाकिस्तानी क्रिकेट संघ काळी पट्टी बांधून खेळेल असेही चौधरी म्हणाले. या ट्वीटनंतर नेटकऱ्यांनी मात्र त्यांच्यावर टिकेचा पाऊस पाडत, हिंदुस्थानी लष्कराच्या सन्मानार्थ विराटसेनेने ही कॅप घातल्याचे लक्षात आणून दिले. तसेच पाकिस्तानने येथे वेळ देण्यापेक्षा दहशतवाद्यांवर कारवाई करावी असाही सल्ला नेटिझन्सने दिला.