तालिबान पाकिस्तानच्या हातातील बाहुले, अफगाणिस्तानात दहशतवादी सरकार आणण्याच्या हालचाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रचंड हिंसाचार, रक्तपात घडवून अफगाणिस्तान बळकावणारी तालिबान संघटना पाकिस्तानच्या हातातील बाहुले असल्याचे स्पष्ट झाले आहे. तालिबानच्या राजवटीत पाकिस्तानने मागच्या दाराने एण्ट्री मिळवली असून अफगाणिस्तानच्या नव्या सरकारची धुरा दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्कच्या हाती देण्याचे षड्यंत्र आहे. मुल्ला अब्दुल गनी बरादरला पंतप्रधान बनू न देण्यासाठी ‘आयएसआय’चा म्होरक्या हमिद फैज काबूलमध्ये पोचला आहे. पाकिस्तानच्या या लुडबुडीमुळे तालिबान सरकारची घोषणा बोंबलली आहे.

अमेरिकेच्या सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबान्यांनी एकेक प्रांत करीत संपूर्ण अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला. पुढे काही दिवसांत सरकार स्थापण्यासाठी हालचाली सुरू झाल्या.

पण पाकिस्तानने ढवळाढवळ करून नव्या सरकारचे घोंगडे भिजत ठेवले आहे. मुल्ला बरादरला नव्या सरकारचा प्रमुख बनू न देण्यासाठी पाकिस्तानने जंगजंग पछाडले आहे. त्याजागी आपल्या मुठीत असलेल्या हक्कानी नेटवर्कच्या नेत्याला प्रमुख बनवण्यासाठी पाकिस्तानने कुरापती सुरू केल्या आहेत. तालिबानी गट आणि मुल्ला बरादरमध्ये अनेक मुद्यांवर मतभेद आहेत. याच पार्श्वभूमीवर बरादरने पंजशीरमधील संघर्षातून आपल्या लोकांना दूर केले आहे. याच अंतर्गत कलहाचा आणखी भडका उडवण्यासाठी आयएसआयचा म्होरक्या फैज काबूलमध्ये पोचला आहे.

पंजशीर संघर्षात तालिबान्यांना पाकिस्तानी सैनिकांची मदत

अफगाणी माध्यमांच्या वृत्तानुसार, पंजशीरच्या संघर्षात पाकिस्तानचे सैनिक तालिबानला साथ देत आहेत. या संघर्षात मारल्या गेलेल्या एका दहशतवाद्याजवळ पाकिस्तानी सैनिक असल्याचे आयकार्डही सापडले आहे. तालिबान्यांना पाकिस्तानची मदत असल्याचा आरोप याआधी वेळोवेळी झाला आहे. अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा मिळवण्यामागेही पाकिस्तानचाच हात असल्याचे बोलले जात आहे.

पंजशीरमध्ये 600 तालिबान्यांचा खात्मा

पंजशीरमध्ये तालिबान आणि रेजिस्टंस फोर्सेसमध्ये रक्तरंजित संघर्ष सुरूच आहे. या संघर्षात जवळपास 600 तालिबानी मारले गेल्याचे ‘स्पुतनिक’ने अफगाण रेजिस्ंटस फोर्सेसच्या हवाल्याने म्हटले आहे. शनिवारी सकाळपासून पंजशीरच्या विविध जिह्यांत जवळपास 600 तालिबान्यांचा खात्मा करण्यात आला, तर 1 हजारहून अधिक तालिबानी दहशतवाद्यांना कैद केले आहे, असे ट्विट रेजिस्टंस फोर्सचा प्रवक्ता फहीम दास्तीने केले आहे.