
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पाकिस्तानने त्यांच्या हवाई क्षेत्रात हिंदुस्थानी विमानांना घातलेली बंदी उठवल्यानंतर सोमवारी रात्री पाकिस्तानमार्गे पहिले विमान दिल्लीत दाखल झाले. पाकिस्तानने अहमदाबादजवळील टेलेम हे हवाई क्षेत्र हिंदुस्थानी विमानांसाठी खुले केले आहे. दुबईहून दिल्लीला येणारे इंडिगोचे विमान दिल्ली विमानतळावर उतरल्यावर इंडिगो फ्लाईट ऑपरेशन सेंटरला पाकिस्तानच्या नागरी हवाई उड्डाण खात्याच्या (सीएए) संचालकांनी फोन करून विमान सुरक्षितपणे उतरल्याची माहिती घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या. ईदच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने सकारात्मक निर्णय घेतला आहे.
सीएएचे संचालक इंडिगोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना म्हणाले की, हिंदुस्थानी विमानांसाठी असलेली आम्ही आमच्या हवाई क्षेत्रातील बंदी उठवली आहे. तुमचे विमान सुरक्षितपणे उतरल्याचे समजले. आता या मार्गाचा इतर विमानांच्या उड्डाणासाठीही वापर करता येईल, असे सांगत त्यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या. हिंदुस्थानी हवाई दलाने 26 फेब्रुवारीला केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने त्यांची 11 हवाई प्रवेशाची ठिकाणे हिंदुस्थानच्या विमानांसाठी बंद केली होती. त्यामुळे हिंदुस्थानची विमाने दूरच्या मार्गाने पश्चिमेकडील देशांकडे जात होती. पाकिस्तानने रविवारी टेलेम हे पहिले प्रवेशाचे ठिकाण हिंदुस्थानी विमानांसाठी खुले केल्यानंतर इंडिगोचे पहिले विमान पाकिस्तानमार्गे दिल्लीत दाखल झाले आहे.
दोन्ही देशातील तणावाच्या पार्श्वभूमीवर इंडिगोने प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यास दूरच्या मार्गाने प्रवास करण्याची तयारीही ठेवली होती. त्यासाठी विमानात पुरेसे इंधनही भरण्यात आले होते.
























































