
सामना ऑनलाईन, इस्लामाबाद
पाकिस्तानी न्यायमूर्ती काय करतील सांगता येत नाही. २०१६ मध्ये ग्रेनेड कसे चालते याचे प्रात्यक्षिक दाखवावे अशी सूचना पाकिस्तानी न्यायाधीशांनी केली होती. तो ग्रेनेड तिथे फुटला आणि त्यात तीन जण जखमी झाले होते. या मुर्खपणात भर घातली आहे, पनामा खटल्याची सुनावणी करणार्या मोहम्मद बशीर या न्यायमूर्तींनी. नवाझ शरीफ यांच्या १४८ पानी निकालपत्रात या न्यायाधीशांनी इंग्रजीत अनेक चुका केल्या आहेत. guilt चं स्पेलिंग त्यांनी guild केलं आहे. तर मरियमचे वडिल लिहिताना तिचे वडील ऐवजी त्याचे वडील अशी वाक्यरचना या निकालपत्रात केली आहे. brushed aside च्या ऐवजी brushacite शब्द वापरण्यात आला. पुढे Qatari prince च्या ऐवजी Qattery prince असे लिहिले आहे. इंग्लडच्या अधिकार्याचे नाव Errol George च्या ऐवजी Errel Jeorge, Erel George असे चुकीचे लिहिले आहे.
पाकिस्तानच्या राष्ट्रीय लेखापरीक्षण विभागाने ८ सप्टेंबर २०१७ रोजी केस दाखल केली होती. १४ सप्टेंबरपासून या खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली. सलग १० महिने चाललेल्या खटल्यात ८० हून अधिक वेळा शरीफ यांच्या कुटुबीयांचा न्यायालयात हजर व्हावे लागले. ३ जुलै रोजी शेवटचा युक्तिवाद कोर्टात केला गेला. संरक्षण विभागाकडून शेवटचा युक्तिवाद केल्यानंतर ६ जुलै रोजी या खटल्याची सुनावणी होईल, असं न्यायाधीशांनी जाहीर केले. ६ जुलै रोजी सुनावणीची वेळ आली तेव्हा न्यायाधीशांकडून वारंवार सुनावणीची वेळ पुढे ढकलण्यात आली. शरीफ यांनी आपल्या बायकोची तब्येत ठीक नसल्याच्या कारणाने सुनावणी एक आठवडा पुढे ढकलावी अशी याचिका दाखल केली. ही याचिक रद्द झाल्यानंतर १२.३० सुनावणीची वेळ देण्यात आली. १२.३० पुन्हा वेळ पुढे ढकलून ती २.३० ची वेळ ठरवली. अखेर ३ वाजता मोठ्या कष्टाने निकालपत्र जाहीर करण्यात आले आणि त्यातही आता चुका दिसून आल्याने पाकिस्तानच्या न्यायव्यवस्थेचं जागतिक पातळीवर हसं होत आहे.

























































