
सामना ऑनलाईन । मुंबई
क्रिकेट इतिहासामध्ये 1982 चा वर्ल्डकप अमूलाग्र बदल घेऊन आला. पहिल्यांदाच वर्ल्डकप न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित केला गेला. या वर्ल्डकपपासूनच एक दिवसीय क्रिकेटमध्ये पांढरा चेंडू, रंगीत कपडे आणि डे-नाईटचे सामना सुरू झाले. तसेच पहिल्यांदाच या वर्ल्डकपमध्ये 9 संघांचा समावेश करण्यात आला आणि राऊंड रॉबिन पद्धतीने लढती खेळल्या गेल्या. याचा अर्थ सहभागी संघांना प्रत्येकासोबत एक लढत खेळावी लागली. तसेच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या वर्ल्डकपपासून दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पूनरागमन झाले. तसेच याच वर्ल्डकपपासून सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूचा मालिकावीर पुरस्कार देऊन गौरव करण्याची परंपरा सुरू झाली. खऱ्या अर्थाने हा वर्ल्डकप क्रिकेटमध्ये परिवर्तनाचा ठरला.
वर्ल्डकप इतिहासाची सफर – आणि 1987 पासून ऑस्ट्रेलिया पर्व सुरू
#ICCWorldCup हातातोंडाशी आलेला सामना गमावणाऱ्यात हिंदुस्थानचा पहिला नंबर
नऊ संघांपैकी पहिले चार संघ उपांत्यफेरीमध्ये पोहोचले. पाकिस्तान, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडचा संघ उपांत्यफेरीत पोहोचला. उपांत्यफेरीत पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करताना न्यूझीलंडचा डाव 262 धावांमध्ये गुंडाळला. न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा केल्या त्या कर्णधार मार्टिन क्रो याने. त्याने 91 धावा केल्या. यानंतर पाकिस्तानने इंजमान-उल-हकच्या 37 चेंडूतील 60 धावा करत पाकिस्तानला विजय मिळवून दिला आणि अंतिम फेरी गाठून दिली. दुसरीकडे इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत झालेल्या उपांत्यफेरीच्या लढतीतल इंगलंडने विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. आफ्रिकेला 13 चेंडूत 22 धावांची आवश्यकता असताना पाऊस आला आणि त्यानंतर 1 चेंडूत 22 धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले. यामुळे मोठा वादही झाला होता.
अंतिम फेरीची थरार
अंतिम फेरीमध्ये प्रथमच धडक दिलेल्या पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 249 धावा केल्या. कर्णधार इम्रान खानने सर्वाधिक 72 धावा करत संघाला आव्हानात्म धावसंख्या गाठून दिली. त्यानंतर वसिम अक्रमच्या धारधार गोलंदाजीच्या बळावर इंग्लंडचा डाव 227 धावांमध्ये गुंडाळत 22 धावांनी विजय मिळवत पहिल्यांदा विश्वचषक उंचावला.
हिंदुस्थानची कामगिरी
1987 च्या वर्ल्डकपमध्ये उपांत्यफेरी गाठलेल्या हिंदुस्थानला 92 च्या वर्ल्डकपमध्ये निराशा हाती आली. राऊंड रॉबिन पद्धतीने झालेल्या या वर्ल्डकपमध्ये आठ लढतींपैकी पाच पराभव, दोन विजय आणि एक सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे हिंदुस्थानला पहिल्या फेरीतूनच गाशा गुंडाळावा लागला. परंतु याच वर्ल्डकपमध्ये हिंदुस्थानला सचिन तेंडुलकर नावाचा हिरा मिळाला.
























































