
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पाकिस्तानी सैन्याकडून सीमारेषेवर सुरू असलेल्या आगळीकीला हिंदुस्थानी लष्कराने मंगळवारी जोरदार प्रत्युत्तर दिले. हिंदुस्थानी जवानांनी केलेल्या कारवाईमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या सात चौक्या उद्ध्वस्त झाल्याची माहिती निमलष्करी दलाने दिली आहे. वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघण करणाऱ्या पाकड्यांना हिंदुस्थानच्या कारवाईमुळे दणका बसला आहे.
हिंदुस्थान लष्कराने केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या तीन जवानांचा खात्मा झाला आहे. जवानांच्या मृत्यूच्या बातमीला पाकिस्तानी सैन्याने देखील दुजोरा दिला आहे. पाकिस्तानी जरी तीन जवानांचा मृत्यू झाल्याचे कबुल केले असले तरी हिंदुस्थानने मात्र मृतांचा आकडा जास्त असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तान खरा आकडा लपवत असल्याचे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
Jammu & Kashmir: Pakistan violated ceasefire in Shahpur & Kerni sectors of Poonch district today at about 1700 hours, by resorting to shelling with mortars & firing of small arms along LoC. Indian Army is retaliating.
— ANI (@ANI) April 2, 2019
संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी सांगितले की, पाकिस्तानने सायंकाळी पाचच्या दरम्यान पुंछच्या शाहपूर आणि केरनी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघण करत गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला. तसेच सकाळी नौशेरा सेक्टरमध्ये देखील गोळीबार केला. पाकिस्तानच्या या शस्त्रसंधीच्या उल्लंघणाला हिंदुस्थानी लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिले. हिंदुस्थानच्या कारवाईत पाकड्यांच्या सात चौक्या उद्ध्वस्त झाल्या व तीन जवानांचा मृत्यू झाला.
सोमवारी पाकिस्तानच्या गोळीबारामध्ये बीएसएफचा एक अधिकारी शहीद झाला होता, तर एका महिलेचा आणि पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. पाकिस्तानच्या या भ्याड गोळीबारानंतर हिंदुस्थानी लष्कराने सीमारेषेवर स्नायपर्स तैनात केले होते.



























































