
टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी एक विलक्षण रोमांचक सामना क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळाला. हिंदुस्थान आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी या सामन्या एकमेकांविरुद्ध उभे ठाकले होते. शेवटच्या चेंडुपर्यंत श्वास रोखायला लावणाऱ्या या सामन्यात हिंदुस्थानने विजय मिळवला.
पण, या निमित्ताने टीम इंडिया आणि पाकिस्तानच्या चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा खुन्नस पाहायला मिळाली. ही खुन्नस फक्त मैदानावरचीच नसून एका माणसाला चक्क त्याच्या बायकोने संतापून व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केल्याचं वृत्त आहे.
इक्बाल आणि कुरअत-उल-ऐन असं या जोडप्याचं नाव आहे. इक्बाल हे लखनौचे रहिवासी आहेत. तर कुरअत या कराचीच्या आहेत. कुरअत म्हणतात की, मी खरंतर माझ्या नवऱ्याला खुश ठेव अशी प्रार्थना करत असते. पण, हिंदुस्थान पाकिस्तान सामन्यानंतरचा हा आनंद मला बघवत नाहीये, असं त्या म्हणतात.
कारण, अखेर देशाप्रतिचा अभिमान हा त्यांच्या नात्यातही उतरला आहे. जेव्हा हिंदुस्थान पाकिस्तानचा सामना सुरू असतो, तेव्हा इक्बाल आणि कुरअत यांच्या घरात एकदम तणावपूर्ण वातावरण असतं. कुरअत यांचं आपल्यावर प्रेम आहे, पण हिंदुस्थानविरुद्धच्या सामन्यात मी त्यांचा शत्रू होऊन जातो, त्यामुळे हिंदुस्थानचे खेळाडू फटकेबाजी करत असतील तरी मला माझा आनंद उड्या मारून साजरा करता येत नाही. कारण, त्यामुळे कुरअत दुखावली जाते, असं इक्बाल सांगतात. यापूर्वीच्या सामन्यांमध्येही हेच घडलं होतं, अशी पुस्तीही ते जोडतात. आता रविवारच्या सामन्यांतर त्यांच्यासमोर वेगळंच संकट उभं राहिलं आहे, कारण या सामन्यानंतर आता इक्बालला कुरअत यांनी संतापून व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केलं आहे.




























































