नाराज पंकजा मुंडे म्हणतात; पदासाठी कुणासमोरही हात पसरणार नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली. भाजपकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळेल अशी त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना अपेक्षा होती, परंतु अपेक्षाभंग झाला. त्यामुळे पंकजा नाराज झाल्या आहेत, परंतु पदासाठी कुणासमोरही हात पसरणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.

बुलढाण्यातील दुसरबीड येथे माजी आमदार तोताराम कोयंदे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, ‘‘माझे माता-पिता, माझे सर्वस्व तुम्ही आहात. एखाद्या गरीब माणसाच्या पायावर डोकं ठेवून नतमस्तक होईन, पण पदासाठी कुणासमोर हात पसरणार नाही. आमच्या रक्तातच तशी सवय नाही.’’

पंकजा यांना विधान परिषदेची उमेदवारी का मिळाली नाही, असे पुण्यातील पत्रकारांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, या वर्षभरात खूप वाव आहे. मिळेल त्यांना उमेदवारी. बावनकुळेंना दोन वर्षांनंतर तिकीट मिळाले याकडे पाटील यांनी लक्ष वेधले.