वणी पोलिसांचा दणका! 56 हजारांच्या दारूसाठी वापरली 12 लाखांची ‘XL6’ कार; तस्करांचा नवा फंडा उघड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वणी शहरात अवैध दारू वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. गोकुळनगर परिसरात सापळा रचून देशी दारूचे 14 बॉक्स आणि वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी एक आलिशान निळ्या रंगाची मारुती सुझुकी XL6 कार असा एकूण 12 लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्ता पेंडकर आणि त्यांच्या पथकातील कर्मचारी सुधीर पांडे हे वणी शहरात गस्त घालत असताना, दीपक चौपाटी चौक परिसरात अवैधरीत्या देशी दारूची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांना सोबत घेत गोकुळनगर परिसरातील सतारभाई यांच्या भंगार दुकानासमोर सापळा रचला. काही वेळातच दीपक चौपाटीच्या दिशेने येणारी निळ्या रंगाची मारुती सुझुकी XL6 कार पोलिसांना दिसून आली. पोलिसांची चाहूल लागताच कार लालगुडा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दिशेने वळविण्याचा प्रयत्न झाला; मात्र सतर्क पोलिसांनी तात्काळ वाहन अडवून त्याची कसून तपासणी केली.

डिक्कीत आढळले दारूचे 14 बॉक्स

कारच्या डिक्कीची पंचांसमक्ष तपासणी केली असता, डिक्कीमध्ये ‘रॉकेट देशी दारू संत्रा’ असे लेबल असलेल्या 90 मिली क्षमतेच्या बाटल्यांचे तब्बल 14 बॉक्स आढळून आले. या दारूची किंमत 56 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय, तस्करीसाठी वापरण्यात आलेली सुमारे 12 लाख रुपये कीमतीची मारुती सुझुकी XL6 कारही जप्त करण्यात आली आहे.

दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणी पोलिसांनी श्याम संभाजी दुर्गे (वय 40, रा. दामले फैल, वणी) आणि दीपक संपत भवरीया (वय 35, रा. शालिग्राम नगर, घुग्घुस, जि. चंद्रपूर) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65(अ) व 65(ई) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास वणी पोलीस करत आहेत.

दारू तस्करीचा ‘नवा फंडा’!

पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून अवैध दारूची वाहतूक करण्यासाठी आता तस्करांनी नवीन शक्कल लढवल्याचे या कारवाईवरून स्पष्ट होत आहे. सामान्यतः लहान वाहनांमधून होणारी तस्करी आता आलिशान चारचाकी गाड्यांमधून केली जात आहे, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. मात्र, पोलिसांची नजर आता अधिक तीक्ष्ण झाली असून, अशा तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस प्रशासनाला गुन्हेगारांच्या नेहमी एक पाऊल पुढे राहावे लागत असल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.