
उत्तर प्रदेशमधील लखीमपूर शहरातील ढखेरवा परिसरात एका प्रेमी युगुलाने झाडांना गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत दोघेही वेगवेगळ्या जातींचे आणि वेगवेगळ्या गावांतील रहिवासी होते. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली.
पढुआ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलवापुरवा गावाजवळ रामलखन कश्यप यांच्या शेतात सकाळी ग्रामस्थांना एका झाडावर तरुणीचा तर दुसऱ्या झाडावर तरुणाचा मृतदेह फासावर लटकलेला दिसला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह खाली उतरवले आणि ग्रामस्थांच्या मदतीने मृतांची ओळख पटवली. तपासादरम्यान तरुणीची ओळख बेंचेपुरवा येथील रमा (22) म्हणून पटली, तर तरुणाची ओळख पचासा गावातील रहिवासी १७ वर्षीय जितेंद्र (मजूर) अशी झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र हा लखनौमध्ये मजुरीचे काम करत होता, तर विवाहित असलेली रमा काही दिवसांपासून माहेरी बेंचेपुरवा येथे आली होती. रमाच्या गावापासून सुमारे १० किमी अंतरावर जितेंद्रचे गाव आहे. जितेंद्रच्या घरासमोरच रमाच्या मोठ्या बहिणीचे सासर आहे. रमा वारंवार बहिणीकडे जात असल्याने या दोघांची ओळख झाली आणि त्यातून प्रेमसंबंध जुळले होते.
रमाचे १५ महिन्यांपूर्वी लग्न झाले होते, मात्र ती पतीसोबत नांदत नव्हती असे समजते. तर जितेंद्र हा अविवाहित होता. दोघेही वेगवेगळ्या जातींमधील असल्याने या नात्याला सामाजिक अडचणी होत्या. यातूनच दोघांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
























































