टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर सिने वर्कर्स असोसिएशननेचे केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र, NIA चौकशीसह 8 मागण्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर मुंबईतील जुहू परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने (AICWA) आक्रमक भूमिका घेतली आहे. संघटनेचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. टायगर श्रॉफ आणि त्याच्या कुटुंबीयांना पूर्ण सुरक्षा देण्यासोबतच, या प्रकरणाची राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) चौकशी करण्याची मागणीही संघटनेने केली आहे.

AICWA ने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये या घटनेचे गांभीर्य अधोरेखित केले आहे. दिवसाढवळ्या झालेला हा गोळीबार एखाद्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असल्यासारखा वाटत होता; मात्र प्रत्यक्षात गोळ्या झाडल्या जात होत्या. दिवाळीच्या फटाक्यांप्रमाणे गोळ्या झाडल्या जात असल्याचे भयावह दृश्य होते, असे संघटनेने म्हटले आहे. हा प्रकार बॉलिवूडसाठी धक्कादायक असून, या घटनेचा व्हिडिओ पाहणाऱ्या कोणालाही धक्का बसेल, अशी प्रतिक्रिया संघटनेने व्यक्त केली.

मुंबईच्या रस्त्यांवर पुन्हा एकदा रक्त सांडले असून, टायगर श्रॉफ आणि त्याचे कुटुंबीय भीतीच्या वातावरणात जगत असल्याचे AICWA ने म्हटले आहे. टायगर श्रॉफ आपल्या कारमध्ये बसलेला असताना जुहू परिसरात त्याच्यावर गोळीबार झाल्याचे संघटनेने पत्रात नमूद केले आहे. या घटनेत दोन जणांना गोळ्या लागल्या, तर टायगर श्रॉफ थोडक्यात बचावला, असा दावा संघटनेने केला आहे. टायगर श्रॉफचा कोणाशीही वाद किंवा वैर असल्याची माहिती नसतानाही त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना भीतीचा सामना करावा लागत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

यापूर्वी सलमान खान, सैफ अली खान, रोहित शेट्टी आणि कपिल शर्मा यांच्याशी संबंधित हल्ल्यांच्या घटनांचा उल्लेख करत AICWA ने चिंता व्यक्त केली. आज टायगर श्रॉफ लक्ष्य ठरला आहे, उद्या कोणाचा नंबर लागणार, असा सवाल संघटनेने उपस्थित केला आहे.

AICWA च्या अमित शाह यांच्याकडे 8 प्रमुख मागण्या

1. टायगर श्रॉफ आणि कुटुंबीयांना सुरक्षा: टायगर श्रॉफ आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला पूर्ण सुरक्षा पुरवावी.
2. NIA आणि केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी: महाराष्ट्र पोलिसांच्या समन्वयाने NIA आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांनी या गोळीबारामागील टोळ्यांच्या जाळ्याची चौकशी करावी.
3. आरोपींना अटक: गोळीबार करणारे प्रत्यक्ष आरोपी आणि गोळीबाराचा कट रचणारे किंवा आदेश देणारे यांना अटक करावी.
4. जलदगतीने खटला: कठोर कायद्यांनुसार या प्रकरणाची जलदगती न्यायालयात सुनावणी करावी.
5. चित्रपटसृष्टीसाठी विशेष कृती दल: चित्रपटसृष्टीतील कलाकार, निर्माते आणि इतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र कृती दल स्थापन करावे.
6. प्रशासकीय उत्तरदायित्व निश्चित करावे: वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमधील सुरक्षा यंत्रणेच्या अपयशाची जबाबदारी निश्चित करावी.
7. गुंडांच्या दहशतीचा कायमस्वरूपी अंत: बॉलिवूडमध्ये गुंडांच्या दहशतीचे वातावरण कायमचे संपवावे.
8. कारवाईचा कालबद्ध अहवाल: या प्रकरणात आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली आणि पुढे कोणती पावले उचलली जाणार आहेत, याचा ठरावीक कालमर्यादेत अहवाल द्यावा.

‘मुंबईला 1990 च्या दशकातील अंडरवर्ल्डचे दिवस परत येऊ देणार नाही’

चित्रपटसृष्टीतून लाखो लोकांना रोजगार मिळतो. मात्र, अंडरवर्ल्डची भीती कायम राहिली, तर चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलाकार आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींना मुंबई सोडण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती AICWA ने व्यक्त केली आहे.

मुंबईला 1990 च्या दशकातील अंडरवर्ल्डच्या दहशतीच्या काळात पुन्हा जाऊ दिले जाणार नाही आणि बॉलिवूडला भीतीच्या सावटाखाली काम करण्यास भाग पाडले जाणार नाही, असा ठाम इशाराही संघटनेने दिला आहे.

AICWA ने टायगर श्रॉफ आणि त्याच्या कुटुंबीयांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे असल्याचे स्पष्ट केले आहे. या घटनेची गंभीर दखल घेऊन केंद्र सरकारने तातडीने पावले उचलावीत आणि चित्रपटसृष्टीतील कलाकारांसह सर्व संबंधितांच्या सुरक्षेची खात्री करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.