
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशच्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार आणि अनियमितता असल्याचा गंभीर आरोप केला आहे. एकाच महिलेच्या नावाने मतदार यादीत अनेक नोंदी असल्याची धक्कादायक बाब त्यांनी उघडकीस आणली असून, यावरून त्यांनी निवडणूक आयोग आणि सत्ताधारी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
अखिलेश यादव म्हणाले आहेत की, आझमगड आणि गोरखपूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मतदार यादीत प्रचंड गोंधळ आहे. काही ठिकाणी तर एकाच व्यक्तीची नावे मतदार यादीत चक्क १० वेळा नोंदवली गेल्याचे समोर आले आहे. निवडणूक आयोगाकडून राबवल्या जाणाऱ्या पडताळणी प्रक्रियेनंतरही एवढी मोठी चूक कशी राहू शकते, असा सवाल उपस्थित करत त्यांनी या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच संशय व्यक्त केला आहे.
या मुद्द्यावरून अखिलेश यादव यांनी भाजपवर आणि निवडणूक आयोगावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. निवडणूक आयोग हा भाजपच्या दबावाखाली काम करत असून, सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावरच मतदार याद्या बनवल्या जात असल्याचा घणाघात त्यांनी केला. भाजपला ज्यांची नावे यादीत हवी आहेत, त्यांचीच नावे यात समाविष्ट केली जात आहेत. तसेच तुम्ही भाजपचे समर्थक असाल, तरच तुम्हाला मतदार आणि देशाचे नागरिक मानले जात आहे, अशी टीका त्यांनी केली.
मतदार यादीतील या दुबार आणि बनावट नोंदींच्या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून निवडणूक आयोगाने यावर अधिकृत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी समाजवादी पक्षाने केली आहे.



























































