
पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या दापोली तालुक्यातील लाडघर ते कर्दे दरम्यानच्या जोड रस्त्याची सध्या प्रचंड दुरवस्था झाली असून या मार्गावर खड्डे आणि उखडलेली खडी यामुळे वाहनचालक व पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कोकण किनारपट्टीवरील हे दोन्ही समुद्रकिनारे पर्यटकांचे मुख्य आकर्षण असूनही या महत्त्वाच्या अंतर्गत रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा सूर स्थानिक नागरिक आणि रिसॉर्ट व्यावसायिकांमधून उमटत आहे.
दापोली तालुक्यातील पर्यटनदृष्ट्या अतिशय महत्वाच्या अशा लाडघर आणि कर्दे रस्त्याच्या सद्यस्थितीमुळे वाहन चालकांना वाहन चालवणे कठीण झाले आहे. या दोन्ही समुद्र किनाऱ्यावरील गावांना जोडणाऱ्या रस्त्यावरील डांबर पूर्णपणे उखडले असून जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावर आलेल्या खडीमुळे वाहने घसरण्याची आणि पंक्चर होण्याची शक्यता वाढली आहे. अवघ्या काही किलोमीटरच्या या अंतरासाठी पर्यटकांना अत्यंत संथ गतीने वाहने चालवावी लागत असल्यामुळे प्रवासाचा वेळ वाढतो आहे त्यामुळे येथे आलेल्या पर्यटकांच्या वेळेचा अपव्यय होत आहे.
लाडघर आणि कर्दे ही दोन्ही ठिकाणे डॉल्फिन सफारी आणि वॉटर स्पोर्ट्ससाठी प्रसिद्ध आहेत. मात्र खराब रस्त्यांमुळे पर्यटकांमध्ये नाराजी पसरते. ज्याचा फटका येथील हॉटेल, होमस्टे आणि स्थानिक व्यावसायिकांना बसत असल्याने त्याचा थेट परिणाम हा पर्यटनावर आणि स्थानिक व्यवसायांवर होत आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यटकांकडून या संपूर्ण मार्गाची तातडीने सुधारणा करून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.


























































