खेळताना तोल जाऊन पडल्याने 5 वर्षांच्या चिमुरड्याच्या तोंडात घुसली लोखंडी सळई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घराबाहेर खेळत असताना तोल जाऊन पडल्याने एका पाच वर्षांच्या चिमुरड्याच्या तोंडात लोखंडी सळई घुसल्याची घटना गुजरातमधील पाटण जिल्ह्यातील सामी तालुक्यातील वेद गावात घडली आहे. सुदैवाने, डॉक्टरांनी तातडीने केलेल्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेमुळे या चिमुकल्याचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वेद गावातील हा ५ वर्षांचा मुलगा घराबाहेर खेळत होता. खेळत असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो जमिनीवर जोरात पडला. त्याच ठिकाणी उघड्यावर पडलेली एक लोखंडी सळई थेट त्याच्या तोंडात घुसली. या भीषण अपघातात मुलगा गंभीर जखमी होऊन त्याच्या तोंडातून मोठ्या प्रमाणावर रक्त वाहू लागले. मुलाची गंभीर अवस्था पाहून पालकांनी क्षणाचाही विलंब न लावता १०८ रुग्णवाहिकेशी संपर्क साधला आणि त्याला तातडीने राधनपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.

शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी केली असता, लोखंडी सळई दाताजवळ जबड्यात खोलवर घुसल्याचे समोर आले. सळई अत्यंत संवेदनशील ठिकाणी अडकल्याने ती काढणे मोठे आव्हानात्मक होते. यामुळे शासकीय वैद्यकीय पथकाने एका खाजगी दंतशल्यचिकित्सकाला (डेंटल सर्जन) पाचारण करून तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

४० मिनिटांत यशस्वी शस्त्रक्रिया

डॉक्टरांच्या पथकाने सुमारे ४० मिनिटे अत्यंत नाजूक व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पाडली. मुलाचा जबडा आणि आजूबाजूच्या नसांना इजा न पोहोचवता डॉक्टरांनी ती लोखंडी सळई यशस्वीरीत्या बाहेर काढली. शस्त्रक्रियेनंतर चिमुरड्याची प्रकृती स्थिर असून त्याला असह्य वेदनांतून आराम मिळाला आहे.