रशिया-युक्रेन युद्धावर डोनाल्ड ट्रम्प यांचे खडे बोल; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यावर गंभीर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या चार वर्षांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे युक्रेनची अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे.  यावर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर एक महत्त्वपूर्ण पोस्ट शेअर केली आहे. याद्वारे त्यांनी रशियासोबतच्या डिझेल कराराचे समर्थन केले असून, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्यावर निशाणा साधला आहे. झेलेन्स्की यांना हे युद्ध कधी संपवायचेच नव्हते अशी टीका ट्रम्प यांनी केली आहे. शिवाय रशियाबाबतचा आपला निर्णय अत्यंत स्पष्ट असल्याचे सांगत रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवून शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चा करत आहे. त्यामुळे रशियाला चर्चेतून बाहेर पडायला भाग पाडेल, असे कोणतेही चुकीचे पाऊल मला उचलायचे नाही असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

झेलेन्स्की यांच्यावर टीका करताना ट्रम्प यांनी लिहिले की, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जाणीवपूर्वक रशियामधील डिझेल रिफायनरींना लक्ष्य करत आहेत. या हल्ल्यांमुळे अमेरिकेसह जागतिक डिझेल बाजारपेठेचे प्रचंड नुकसान होत असून, देशातील शेतकरी, पशुपालक आणि सर्व प्रकारच्या व्यवसायांना मोठा फटका बसत आहे, याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. असे असूनही, रशिया जगाला कमी किमतीत लाखो बॅरल डिझेलचा पुरवठा करत आहे, परंतु झेलेन्स्की यांना या गोष्टीची अजिबात पर्वा नाही, असा आरोप ट्रम्प यांनी केला.

युरोपियन देशांकडून मिळणारा अफाट निधी आणि भूतकाळात ‘भ्रष्ट जो बायडेन’ यांच्याकडून मिळालेली मदत पाहता, झेलेन्स्की यांना हे युद्ध कधी संपवायचेच नव्हते अशी टीका ट्रम्प यांनी केली. दोन वर्षांपूर्वी झेलेन्स्की यांच्याकडे यापेक्षा कितीतरी चांगला आणि फायद्याचा करार करण्याची संधी होती, अशी आठवण करून देत ट्रम्प म्हणाले की, आज त्यांचा देश पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे, त्यांनी आपल्या जमिनीचा मोठा भाग गमावला आहे, त्यांचे समुद्र आणि जलक्षेत्र हातातून गेले आहेत, तसेच त्यांची पुरुष लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर घटली असून अनेक तरुण जखमी झाले आहेत किंवा मारले गेले आहेत. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत हे युद्ध लवकरात लवकर संपवायचे आहे, असे स्पष्ट मत ट्रम्प यांनी व्यक्त केले.